मिठाई नाकारली, सीमेवर गोळीबार

By admin | Published: July 19, 2015 02:40 AM2015-07-19T02:40:52+5:302015-07-19T02:40:52+5:30

सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी ईदनिमित्त सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) देण्यात

Sweets rejected, firing on the border | मिठाई नाकारली, सीमेवर गोळीबार

मिठाई नाकारली, सीमेवर गोळीबार

Next

अमृतसर/जम्मू : सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी ईदनिमित्त सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) देण्यात आलेली मिठाई स्वीकारण्यास नकार दिला.
उभय देशांच्या सीमा सुरक्षा दलातर्फे जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पंजाबच्या अमृतसरमध्ये अटारी वाघा सीमेवर सणउत्सवाला एकमेकांना मिठाई वाटण्याची परंपरा आहे. अमृतसरमध्ये बीएसएफचे उपमहासंचालक एम.एफ. फारुकी यांनी सांगितले की, वाघा सीमेवर आम्ही मिठाई दिली; परंतु दुसऱ्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही दरवेळी ईदला मिठाई देतो. आज पाकी सैनिकांनी मिठाई घेतली नाही. आंतरराष्ट्रीय सीमेवर मात्र बीएसएफने आपल्या समकक्षांना मिठाई दिली नाही. दलाच्या वरिष्ठ कमांडरने दिल्लीतील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाककडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा निषेध नोंदविण्यासाठी मिठाईचे वाटप करण्यात आले नाही. (वृत्तसंस्था)

चोराच्या उलट्या बोंबा
नवी दिल्ली- पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत व आमचे त्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू असतात. दोन्ही बाजूंची इच्छा असेल तर द्विपक्षीय संबंधात मिठाचा खडा ठरणाऱ्या समस्या सहज सुटू शकतात,असे प्रतिपादन भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी शनिवारी केले.
ईदेच्या पर्वावर बासित यांनी येथील फतेहपुरी मशिदीच्या इमामांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उभय देशांमधील संबंधात सुधारणा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. दोन्ही देशांची इच्छाशक्ती असल्यास गरिबी, निरक्षरता आणि आरोग्यविषयक समान मुद्यांवर नक्कीच तोडगा काढता येईल.

पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, अग्निबाणांचा मारा
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी छोट्या अग्निबाणांचा मारा करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मागील १२ तासातील शस्त्रसंधी उल्लंघनाची ही दुसरी घटना आहे.
पाकिस्तानी सैन्याने पुंछ सेक्टरमध्ये शाहपूर केरनी भागात लष्कराच्या अनेक चौक्यांवर कुठल्याही चिथावणीशिवाय गोळीबार केला. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेला हा गोळीबार अद्याप थांबलेला नसून भारतीय जवानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले.
शुक्रवारी रात्री उशिरा सुद्धा पाकी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात कुठलीही जीवहानी झाल्याचे वृत्त नाही. या महिन्यात सीमेपलिकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या १५ जुलैला पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्णात केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एक महिला ठार तर सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांसह सहा जण जखमी झाले होते. तत्पृूर्वी ९ जुलैला उत्तर काश्मीरच्या आघाडीच्या चौक्यांवर गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.

पुन्हा पाकिस्तान, इसिसचे झेंडे फडकले
श्रीनगर : ईदेच्या नमाजानंतर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्णासह आणखी काही भागात दगडफेक करणारे युवक आणि सुरक्षा दलादरम्यान चकमकी उडाल्या. याशिवाय शहरातील जुन्या बरजुल्ला परिसरात पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचे (इसिस) झेंडे फडकविण्यात आले. दगडफेकीच्या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी सुद्धा काही फुटीरवाद्यांनी पाकिस्तान, लष्कर-ए-तय्यबा आणि इसिसचे झेंडे फडकविल्यानंतर काही युवक आणि सुरक्षा जवानांमध्ये बाचाबाची झाली होती.

Web Title: Sweets rejected, firing on the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.