वरिष्ठ पत्रकार के.जे.सिंग आणि त्यांची आई घरात मृतावस्थेत आढळले, पोलिसांना हत्येचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 03:15 PM2017-09-23T15:15:54+5:302017-09-23T17:32:01+5:30

वरिष्ठ पत्रकार के.जे.सिंग आणि त्यांची 92 वर्षीय वृद्ध आई राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Senior journalist KJ Singh and his mother found the dead in a living house, police suspected of murder | वरिष्ठ पत्रकार के.जे.सिंग आणि त्यांची आई घरात मृतावस्थेत आढळले, पोलिसांना हत्येचा संशय

वरिष्ठ पत्रकार के.जे.सिंग आणि त्यांची आई घरात मृतावस्थेत आढळले, पोलिसांना हत्येचा संशय

googlenewsNext

चंदीगड -  वरिष्ठ पत्रकार के.जे.सिंग आणि त्यांची 92 वर्षीय वृद्ध आई राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते पंजाब मोहाली येथे राहत होते. के.जे.सिंग आणि त्यांची आई गुरुचरण कौर यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

सिंग यांनी इंडियन एक्सप्रेस दैनिकात काम केले आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. केजे सिंग यांच्या गळयावर व्रण आढळले असल्याची माहिती मोहालीचे पोलीस उपाधीक्षक आलम विजय सिंग यांनी दिली. त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली होती. अनेक आघाडीच्या दैनिकांमध्ये त्यांनी काम केले होते. 

या दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी पंजाब पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांच्या निर्देशावरुन एसआयटीची स्थापना करण्यात आली. काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. अजूनही पोलीस लंकेश यांच्या मारेक-यांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. 

शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी टि्वट करुन केजे सिंग आणि त्यांच्या आईच्या हत्येचा निषेध केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची त्यांनी विनंती केली आहे.

काही दिवसांपूर्वी देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री आठ सव्वाआठच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी गौरी यांच्या घरात घुसले आणि त्यांनी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 55 वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. तसेच त्या विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करायच्या. त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्याने टीका केली होती. 

सोशल मीडियासह सर्वत्र या हत्येचे तीव्र पडसाद उमटले होते. समाजातील अनेक विचारवंत, पत्रकारांनी एकत्र येऊन या हत्येचा निषेध केला होता. या प्रकरणात पोलिसांना अद्याप मारेक-यांपर्यंत पोहोचता आलेले नसून, पोलिसांनी फक्त एका संशयिताला अटक केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिलेल्या आदेशानंतर तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. 



Web Title: Senior journalist KJ Singh and his mother found the dead in a living house, police suspected of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून