आता निवडणूक झाल्यास ‘रालोआ’ला बहुमत नाही, शिवसेनेला मिळणार केवळ 8 जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:36 AM2019-01-07T07:36:43+5:302019-01-07T07:38:04+5:30

जनमत चाचणीचा निष्कर्ष : सत्तेची गुरुकिल्ली ‘इतरां’च्या हाती, महाराष्ट्रात मिळतील भाजपाला २२ जागा

Now, NDA has no majority in the elections, the Shiv Sena will get only 8 seats in lok sabha | आता निवडणूक झाल्यास ‘रालोआ’ला बहुमत नाही, शिवसेनेला मिळणार केवळ 8 जागा

आता निवडणूक झाल्यास ‘रालोआ’ला बहुमत नाही, शिवसेनेला मिळणार केवळ 8 जागा

Next

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक आता झाली, तर भाजपाच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ला (रालोआ) बहुमतासाठी किमान आवश्यक असलेल्या २७२ जागांहून सुमारे १५ जागा कमी मिळतील, असा निष्कर्ष इंडिया टीव्ही-सीएनएक्स यांनी घेतलेल्या एका जनमत चाचणीतून काढण्यात आला आहे. या ताज्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपाला २२, शिवसेनेला आठ, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी नऊ जागा मिळू शकतील.

पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकांनंतर आणि त्यापैकी राजस्थान, छत्तीसगढ व मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतल्यानंतर १५ ते २५ डिसेंबर यादरम्यान लोकसभेच्या सर्व ५४३ मतदारसंघांमध्ये ही जनमत चाचणी घेऊन लोकमताचा कौल अजमावण्यात आला. त्यावरून असे दिसते की, आता लोकसभा निवडणूक झाल्यास कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. ‘रालोआ’ला २५७ पर्यंत व सपा आणि बसपा वगळून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ला (संपुआ) १४६ जागा मिळू शकतील.
अशा त्रिशंकू अवस्थेत सरकार स्थापनेची गुरुकिल्ली या दोन्ही आघाड्यांखेरीज ‘इतर’ पक्षांच्या हाती असेल व अशा या इतर पक्षांना १४० पर्यंत जागा मिळू शकतील. या ‘इतर’ पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, बसपा, अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, डावी आघाडी, मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी, बद्रुद्दीन अजमल यांचा आसाममधील ‘एआययूडूएफ’, असाउद्दीन ओवैसी यांची ‘एमआयएम’, लोकदल, आम आदमी पार्टी व अपक्षांचा समावेश असेल.
विशेष म्हणजे या दोन संस्थांनी मिळून पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका होण्याआधी नोव्हेंबरमध्ये जी देशव्यापी जनमत चाचणी घेतली होती त्यात ‘रालोआ’ला २८१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसली होती. त्यावेळी ‘संपुआ’ला १२४ व ‘इतरां’ना १३८ जागा मिळणे अपेक्षित धरले होते. याचा अर्थ असा की, तीन राज्यांमधील पराभवानंतर ‘रालोआ’च्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असून, त्यांच्या जागा आता आधीच्या तुलनेत २४ ने कमी होऊन ‘संपुआ’च्या २२ जागा वाढल्याचे चित्र दिसले.

आघाड्यांचे संभाव्य चित्र

रालोआ
257


भाजपा- २२३
शिवसेना- ८
जदयु- ११
अकाली दल ५
लोक जनशक्ती ३
पीएमके १
एनडीपीपी १
एआयएनआरसी १
एनपीपी १
एसडीएफ १
अपना दल १
एमएनएफ १

संपुआ आघाडी
146


काँग्रेस ८५
राजद १०
राष्ट्रवादी ९
जेएमएम ४
जनता दल (से) ४
आरएलडी १
मुस्लिम लीग २
तेलगू देसम ४
नॅशनल कॉन्फरन्स २
केरळ काँग्रेस १

इतर पक्ष
140

तृणमूल काँग्रेस २६
समाजवादी पक्ष २०
बसपा १५
वायएसार काँग्रेस १९
तेलंगणा राष्ट्र समिती १६
बिजू जनता दल १३
अण्णद्रमुक १०
डावी आघाडी ८
एएमएमके ४
आम आदमी पार्टी २
पीडीपी १
जेव्हीएम १
एमआयएम १

Web Title: Now, NDA has no majority in the elections, the Shiv Sena will get only 8 seats in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.