राष्ट्रगीत हाच मंत्र : दिलशाद गार्डनमध्ये दररोज बांधली जाते भारतमातेची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:42 AM2018-01-27T04:42:45+5:302018-01-27T04:42:54+5:30

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपला एकदाचा! वाहतूक सिग्नलजवळ हौसेने घेतलेला प्लास्टिकचा तिरंगा आता रस्त्याचा कडेला दिसेल.

National anthem is the mantra: worship of Bharatmata is built daily in Dilshad Garden | राष्ट्रगीत हाच मंत्र : दिलशाद गार्डनमध्ये दररोज बांधली जाते भारतमातेची पूजा

राष्ट्रगीत हाच मंत्र : दिलशाद गार्डनमध्ये दररोज बांधली जाते भारतमातेची पूजा

Next

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपला एकदाचा! वाहतूक सिग्नलजवळ हौसेने घेतलेला प्लास्टिकचा तिरंगा आता रस्त्याचा कडेला दिसेल. आठवडाभराने एखादी स्वयंसेवी संस्था रस्त्यावर विखुरलेला तिरंगा गोळा करण्यासाठी पुढे येईलच! आपले देशप्रेम मग थेट १५ आॅगस्टला उफाळून येईल! पण देशाचे स्मरण सहामाही नव्हे तर रोज व्हायला हवे. दिल्लीच्या दिलशाद गार्डनमधील एलआयसी कॉलनीत ते दररोज होते. भारतमाता मंदिरात देशासाठी पूजा बांधली जाते.
देवीदेवतांची मंदिरे उभारल्या गेली, मात्र भारतमातेचा आपल्याला विसर पडला. याच जाणिवेतून कोणत्याही दैवतापेक्षा श्रेष्ठ असलेल्या भारतमातेचे मंदिर डॉ. अरविंद कुमार गुप्त यांनी उभारले. स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान दिलेल्यांच्या मोजक्या तसबिरी, अष्टभुजाधारी भारतमातेची प्रतिमा उभारून हे मंदिर १५ आॅगस्ट २००९ रोजी त्यांनी सर्वांसाठी खुले केले गेले. आज मंदिरात ३१५ छायाचित्रे आहेत.

मंदिरात धूप-अगरबत्ती, नैवैद्य, श्लोक, मंत्र प्रार्थना होते. भारतमातेच्या मंदिरात मात्र दररोज राष्ट्रगीत म्हटले जाते. दिवा तेवत ठेवण्याऐवजी भारतमातेसमोर तिरंगा फडकवला जातो. शालेय विद्यार्थी, युवक-युवतींची या मंदिरात नेहमी गर्दी असते. देशाप्रति असलेल्या कर्तव्याची जाण मंदिरात प्रवेश करताना होतेच !

स्वामी विवेकानंद म्हणाले होते - ‘पुढची शंभर वर्षे आपले दैवत फक्त भारतमाता असले पाहिजे!’ हेच जणू मंदिराचे संस्थापक डॉ. अरविंद गुप्त यांचे जीवनध्येय आहे. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांच्या परिवारातील डॉ. अरविंद यांचे वडील सुन्नूलाल बिश्वारी स्वातंत्र्यसैनिक होते. अरविंद यांच्या आईचे १० आॅगस्ट २००९ रोजी निधन झाले. आईच्या निधनाच्या अवघ्या पाचच दिवसात त्यांनी मंदिराची कोनशिला ठेवली. आई-वडिलांच्या स्मरणार्थ डॉ. अरविंद यांनी हे मंदिर उभारले आहे.

देश संचलनाचे सूत्र भारतमातेच्या अष्टभुजांमध्ये आहे. भारतमातेच्या हातात नांगर- कृषी, पुस्तक- ज्ञान, शंख- प्रबोधन, तलवार-सुरक्षा, सोन्याची नाणी- संपत्ती व आशीर्वाद देणारा हात संस्कृतीचे प्रतीक आहे. एका हातात तिरंगा आहे. इंग्रजांच्या भारतातील आगमनाची माहिती देणारे छायाचित्र मंदिरात आहे. ‘व्यापार करण्यास आले नि राज्यकर्ते झाले’, असा संदेश त्यात आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून इंग्रजांनी आपल्याला गुलाम कसे बनविले, याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
१८५७ चे स्वातंत्र्यसमर, झाशीची राणी, दांडी मार्च, सविनय कायदेभंग, ‘भारत- छोडो’ आंदोलन, काकोरी दरोडा, चौरी-चौरा हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड, आझाद हिंद फौजेच्या स्थापनेचा इतिहास मंदिरात पाहायला मिळतो. परमवीर चक्राने सन्मानित वीर, आतापर्यंतचे पंतप्रधान, भारतीय वैज्ञानिक, नोबेल पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची छायाचित्रेही मंदिरात मांडण्यात आली आहेत.

Web Title: National anthem is the mantra: worship of Bharatmata is built daily in Dilshad Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.