Jagdeep Dhankar Vice President Election: NDA कडून 'किसान पुत्र' जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 08:01 PM2022-07-16T20:01:46+5:302022-07-16T20:02:45+5:30

सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत

Jagdeep Dhankar is NDA candidate for the post of Vice President of India announcement by BJP chief JP Nadda | Jagdeep Dhankar Vice President Election: NDA कडून 'किसान पुत्र' जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

Jagdeep Dhankar Vice President Election: NDA कडून 'किसान पुत्र' जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

googlenewsNext

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शेतकरी परिवारातील सुपूत्र जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सध्या धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. काही दिवसांपूर्वीच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने आज जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी मतदान ६ ऑगस्टला पार पडणार आहे. तर १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासोबतच, राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे मतदान २२ जुलैला पार पडणार आहे. त्याकरिता सत्ताधारी पक्षाकडून आदिवासी समाजातील महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता आज NDA कडून उपराष्ट्रपती पदासाठी नावाची घोषणा करण्यात आली.

व्यंकय्या नायडू हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२२ ला संपुष्टात येत आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्याआधी त्या पदासाठी पुढील निवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. निवडणुकीच्या वेळी राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतात. तर लोकसभेचे महासचिव हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतात. त्यानुसार ६ ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे. या जागेसाठी भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर जगदीप धनखड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. कालच जगदीप धनखड यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

जगदीप धनखड यांच्याबद्दल महत्त्वाचे-

- जगदीप धनखड हे झुंजनू गावात एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांची एकेकाळी राजस्थानच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख होती. सध्या ते पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी कार्यरत आहेत.

- राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष असलेले धनखड हे राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व आहे. राजस्थानमधील जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

- धनखड हे कायद्यावर प्रभुत्व असलेले, राजकारण, राजकीय डावपेच आणि प्रत्येक पक्षातील नेतेमंडळींशी मैत्रिपूर्ण संबंध असलेले असे व्यक्तिमत्व आहे.

- पश्चिम बंगालमध्ये मारवाडी समाजाचा विशेष प्रभाव आहे. मारवाडी समाज व्यवसाया बरोबरच राजकारणातही सक्रीय असल्यानेच त्यांना पश्चिम बंगाल मधील राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले.

Web Title: Jagdeep Dhankar is NDA candidate for the post of Vice President of India announcement by BJP chief JP Nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.