भारत-चीन संबंध रुळावर, द्विपक्षीय बैठकीचे फलित; मोदी-जीनपिंग यांचा पुनरावृत्ती टाळण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:56 AM2017-09-06T02:56:02+5:302017-09-06T02:56:32+5:30

डोकलाम वाद मागे सारत भारत- चीनने मंगळवारी संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला सहमती दर्शविली. चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करताना संबंध रुळावर आणण्याबाबत इच्छा व्यक्त केली.

On the Indo-China relations, the result of the bilateral meeting; Emphasizing on the repeat of Modi-Jinning | भारत-चीन संबंध रुळावर, द्विपक्षीय बैठकीचे फलित; मोदी-जीनपिंग यांचा पुनरावृत्ती टाळण्यावर भर

भारत-चीन संबंध रुळावर, द्विपक्षीय बैठकीचे फलित; मोदी-जीनपिंग यांचा पुनरावृत्ती टाळण्यावर भर

Next

शियामेन : डोकलाम वाद मागे सारत भारत- चीनने मंगळवारी संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला सहमती दर्शविली. चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करताना संबंध रुळावर आणण्याबाबत इच्छा व्यक्त केली.
सिक्कीममधील डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकल्यानंतर भारत आणि चीनचे संबंध कधी नव्हे तेवढे ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर जीनपिंग यांच्याशी झालेली चर्चा फलदायी ठरल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. डोकलामसारख्या वादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन देशांच्या सैनिकांदरम्यान सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यालाही या नेत्यांनी बैठकीत सहमती दर्शविली.
जीनपिंग यांना भेटलो. द्विपक्षीय संबंधांबाबत आमची चर्चा फलदायी ठरली आहे, असे ट्विट मोदी यांनी या बैठकीनंतर केले. ही बैठक रचनात्मक ठरली असून संबंध सुधारण्याच्या दिशेने दोन्ही देश पुढे वाटचाल करण्याच्या बाजूने आहेत. संबंध बळकट करण्यासाठी सीमेवर शांतता आणि सलोखा राखणे गरजेचे आहे, यावर या बैठकीत सहमती दर्शविली गेली, असे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.
डोकलाम प्रकरण मागे पडले काय? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ही चर्चा भविष्याच्या दिशेने जाणारी होती. मागे वळण्याचा प्रश्नच नाही. मोदी आणि जीनपिंग यांनी संयुक्त आर्थिक गट, सुरक्षा गट आणि रणनीती गटांसारख्या आंतर सरकारी यंत्रणेवर चर्चा केली.

७३ दिवसांनंतर वाद संपुष्टात...
डोकलाममध्ये दोन्ही देशांचे जवान आमने-सामने उभे ठाकल्यानंतर ७३ दिवस तणावाचे वातावरण असताना राजनैतिक पातळीवरील प्रयत्न वाद संपुष्टात आणण्यासाठी कामी आले. चीनच्या लष्कराने डोकलाममध्ये रस्त्याचे सुरू केलेले काम १६ जून रोजी भारतीय जवानांनी थांबविल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. २८ आॅगस्ट रोजी दोन्ही देशांच्या विदेश मंत्रालयाने सैन्य माघारीची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांना पुढील वाटचालीला मदत मिळेल. परस्पर विश्वास बळकट करण्यासह सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील जवानांमध्ये संपर्क आणि सहकार्य वाढविण्यावर भर दिला जावा जेणेकरून अलीकडे घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल. दोन शेजारी किंवा शक्तिशाली देशांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहेत, मात्र ते परस्परांविषयी आदरभाव ठेवून सोडवायला हवे. वाद निकालात काढण्यासाठी समान आधार निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवे, असेही जयशंकर यांनी नमूद केले.
 

Web Title: On the Indo-China relations, the result of the bilateral meeting; Emphasizing on the repeat of Modi-Jinning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.