- सुरेश भटेवरा।

नवी दिल्ली : भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींना थेट आवाहन करणारे ट्विट शुक्रवारी केले व त्यात म्हटले, देशातली प्रसारमाध्यमे आणि जनतेच्या विविध प्रश्नांचा सामना करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेचे प्रमुख पंतप्रधान मोदींनी स्पष्ट उत्तरे देण्यासाठी सर्वांसमोर यावे, त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मध्यमवर्गीयांची, व्यावसायिकांची व छोट्या व्यापा-यांची सरकारला खरोखर किती काळजी आहे, याचाही खुलासा यानिमित्ताने होईल.
ट्विटमध्ये सरकारला इशारा देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारची धोरणे याबाबत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्या धुडकावून लावणे बालिशपणाचे आहे. त्यावर चर्चा सुरू झाली तर ती दूरपर्यंत जाईल. अर्थव्यवस्थेबाबत यशवंत सिन्हांनी ज्या सूचना केल्या आहेत, तो केवळ अर्थमंत्री जेटली व यशवंत सिन्हा दरम्यानचा खासगी वाद नाही. त्या मौलिक सूचनांचे मीच नव्हे, तर देशातल्या विचारवंत नेत्यांनी पक्षातल्या व पक्षाबाहेरच्या अनेकांनी जोरदार समर्थन केले आहे.