राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:49 PM2024-01-18T15:49:00+5:302024-01-18T16:00:01+5:30

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

Half day holiday on 22nd January on the occasion of Pran Pratisthana in Ram Mandir, announced by Central Govt | राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा 

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा 

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकतेचं वातावरण आहे. प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. दरम्यान, या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की, कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेली भावना आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन सरकारने या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. या दिवशी शाळा महाविद्यालयेही अर्धा दिवसच सुरू राहतील.

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त संपूर्ण देशभरात सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये २२ जानेवारी रोजी दुपारी अर्धा दिवस सुट्टी असेल.  राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राम मंदिरामध्ये होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांकडून माहिती घेतली आहे. तसेच या दिवशी दिवाळीसारखा उत्सव साजरा झाला पाहिजे, असं आवाहनही करण्यात आलं आहे. २२ जानेवारी रोजी घरोघरी पणत्या लावण्याचे आणि गरिबांना भोजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच २२ जानेवारीनंतर आपापल्या लोकसभा मतदारसंघातील भाविकांना ट्रेनच्या माध्यमातून अयोध्येला पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.  

Web Title: Half day holiday on 22nd January on the occasion of Pran Pratisthana in Ram Mandir, announced by Central Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.