चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:57 AM2018-08-16T05:57:02+5:302018-08-16T05:57:35+5:30

येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.

Everyone has their own home in four years; Modi's announcement from Red Fort | चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

Next

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली  - येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.
७२व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कोट्यवधी तरुणांना रोजगार, प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीजपुरवठा अशा स्वप्नांची मालिकाच उभी केली आणि देशाचा विकास वेगाने करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखालील सरकार हाच एकमात्र पर्याय देशापुढे असल्याचे सांगत एक प्रकारे निवडणुकांच्या तयारीचे बिगुल फुंकले.
‘हम मख्खनपर नहीं पत्थरपर लकीर खिंचनेवाले लोग है’ असे आत्मविश्वासाने सांगताना निद्रिस्त अवस्थेतील भारताला चार वर्षांत आम्ही जागेच केले नाही, तर त्याचे वेगवान मार्गक्रमणही सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. भारताची जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगत वस्तू व सेवा कराने (जीएसटी) भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली. मुद्रा बँक योजनेमुळे १३ कोटी तरुणांना कर्जपुरवठा झाला. चार कोटी तरुणांनी आयुष्यात प्रथमच कर्ज घेतले. स्वच्छ भारत अभियानामुळे लक्षावधी बालके अनारोग्यापासून वाचली, असे मोदी म्हणाले.

अवकाशात फडकविणार तिरंगा
अंतराळ क्षेत्रात वैज्ञानिकांनी प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली असून २0२२ साली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनी अवकाशवीर तिरंगा हातात घेऊन अंतराळात जाईल आणि अंतराळाला गवसणी घालणारा भारत जगातील चौथा देश बनेल.

सैन्यात महिलांना बरोबरीचे स्थान
सर्जिकल स्ट्राईकद्वारे शत्रूंना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. महिलांनाही लवकरच सशस्त्र दलांमध्ये बरोबरीचे स्थान दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही पंतप्रधानांनी केली.

मोदींना राफेलवर खुल्या चर्चेचे आव्हान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण पोकळ असल्याचे सांगत काँग्रेसने मोदींना राफेल सौद्यासह अन्य मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. - सविस्तर वृत्त/९

सरकारविषयी देशात चार वर्षांपूर्वी असलेली नकारात्मक भावना बदलून टाकण्यात आम्ही यशस्वी झालो, असे नमूद करीत पंतप्रधान म्हणाले, देशात भ्रष्टाचारी, मध्यस्थ अन् दलाल नष्ट झाले आहेत. ईशान्य भारतातील गावांत पहिल्यांदा वीज पोहोचली, तेव्हा सारे गाव आनंदाने नाचले. भारताच्या या दुर्लक्षित भागात विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. दिल्ली या राज्यांच्या दारात उभी करण्यात माझे सरकार यशस्वी ठरले.

आपल्या ८२ मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणात मोदींनी शेतकरी, ओबीसी, दलित, नव्या पिढीतील तरुण, महिला, तीन तलाक, काश्मीर, दक्षिण भारत, सैन्यदल, न्यायालये, शिक्षण, इंटरनेट, अर्थकारण, अंतराळातील झेप असे विविध विषय आणि त्यांच्याशी निगडित भविष्यातील योजनांचा उल्लेख केला. ‘जिद है एक सूर्य उगाना है, अंबरसे उंचा जाना है’ अशा काव्यपंक्ती सादर करीत मजबूत भारताचे चित्रच सादर केले.

Web Title: Everyone has their own home in four years; Modi's announcement from Red Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.