"खासदार भारतात अन् संसदीय ID लॉगिन झाला दुबईत", निशिकांत दुबेंचा पुन्हा महुआ मोईत्रांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:45 PM2023-10-21T17:45:45+5:302023-10-21T17:48:15+5:30

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) ही माहिती तपास यंत्रणांना दिली असल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला आहे.

BJP MP makes 'Dubai' claim against Mahua Moitra, says mortgaged India's security | "खासदार भारतात अन् संसदीय ID लॉगिन झाला दुबईत", निशिकांत दुबेंचा पुन्हा महुआ मोईत्रांवर आरोप

"खासदार भारतात अन् संसदीय ID लॉगिन झाला दुबईत", निशिकांत दुबेंचा पुन्हा महुआ मोईत्रांवर आरोप

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदारमहुआ मोईत्रा आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सातत्याने वाढत आहे. महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला होता. यानंतर आता निशिकांत दुबे यांनी आणखी एक गंभीर आरोप महुआ मोईत्रा यांच्यावर केला आहे. ज्यावेळी महुआ मोईत्रा भारतात होत्या, त्यावेळी त्यांचा संसदीय लॉगिन आयडी दुबईत वापरला जात होता, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. 

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) ही माहिती तपास यंत्रणांना दिली असल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला आहे. "एका खासदाराने थोड्या पैशासाठी देशाची सुरक्षा पणाला लावली. ज्यावेळी दुबईत खासदाराचा आयडी उघडला, त्यावेळी तथाकथित खासदार भारतात होत्या. या एनआयसीवर संपूर्ण भारत सरकार, देशाचे पंतप्रधान, वित्त विभाग, केंद्रीय यंत्रणा आहेत. टीएमसी आणि विरोधकांना अजून राजकारण करायचे आहे का? जनता याचा निर्णय घेईल. एनआयसीने ही माहिती तपास यंत्रणेला दिली आहे", असे निशिकांत दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. दरम्यान, निशिकांत दुबे यांनी या पोस्टमध्ये महुआ मोईत्रा यांचे नाव घेतले नाही.

निशिकांत दुबे यांनी गेल्या रविवारी लोकसभा सभापतींना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला आहे. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, लोकसभेची आचार समिती भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीची चौकशी करत आहे. आचार समितीने निशिकांत दुबे यांना २६ ऑक्टोबरला हजर राहून तोंडी तक्रार करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच, या मुद्द्यावर अद्याप तृणमूल काँग्रेसने काहीही भाष्य केले नाही.

Web Title: BJP MP makes 'Dubai' claim against Mahua Moitra, says mortgaged India's security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.