मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत रामदेवबाबाप्रणीत पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी यांनी ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या २0१७ च्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यादीतील अब्बाधीशांची श्रीमंती ११ टक्क्यांनी वाढली आहे.
‘हुरुन’ने जारी केलेल्या श्रीमंतांच्या सहाव्या वार्षिक यादीनुसार, रिलायन्सच्या समभागांनी जोरदार उसळी घेतल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे.
त्यांची संपत्ती आता २.५७ लाख कोटी झाली आहे. अंबानी हे सलग सहाव्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हुरुनच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते आता १५ व्या स्थानी पोहोचले आहेत. अंबानी यांची संपत्ती येमेनच्या सकळ राष्टÑीय उत्पन्नापेक्षा ५0 टक्के जास्त आहे.
पतंजलीचे सीईओ बालकृष्ण हे आता भारतातील ‘टॉप टेन’ श्रीमंतांत समाविष्ट झाले आहेत. गेल्या वर्षी २५ व्या स्थानी असलेले बालकृष्ण यंदा आठव्या स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती १७३ टक्क्यांनी वाढून ७0 हजार कोटी रुपये झाली आहे. वित्तवर्ष २0१७ मध्ये पतंजलीची उलाढाल १0,५६१ कोटी रुपये झाली. पतंजली आता जागतिक पातळीवरील बड्या ब्रँडच्या स्पर्धेत आली आहे.
डी-मार्टच्या दमानी यांची संपत्ती सर्वाधिक ३२१ टक्क्यांनी वाढली आहे. अनुराग जैन आणि एन्ड्युरन्स टेकच्या परिवाराची संपत्ती २८६ टक्क्यांनी वाढली आहे.
हुरुनच्या अहवालात संपत्तीच्या मोजदादीसाठी ३१ जुलैची आकडेवारी गृहीत धरण्यात आली आहे. डॉलर आणि रुपयाचा विनियम दर त्या दिवशी ६४.१ होता.

क्रमवारीत ५१ स्त्रियांचाही समावेश
मीडिया डॉट नेटचे दिव्यांक तुराखिया वयाच्या ३४ व्या वर्षी स्वबळावर अब्जाधीश बनले आहेत. ४0 वर्षांखालील स्वबळावरील पहिल्या पाच अब्जाधीशांत त्यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व जण तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.
बंगळुरूस्थित ४२ वर्षीय अंबिका सुब्रमण्यम या सर्वांत तरुण स्वबळावरील अब्जाधीश महिला बनल्या आहेत. त्यांनी मु-सिग्मामधील आपले समभाग विकले आहेत. या कंपनीच्या त्याही एक सहसंस्थापक होत्या. श्रीमंतांच्या या यादीत ५१ महिलांचा समावेश आहे.