'19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 03:46 PM2019-01-03T15:46:31+5:302019-01-03T16:00:19+5:30

बटाट्याचे पीक घेताना मला दरवर्षी मोठे नुकसान होते. त्यामुळेच मी जुलै महिन्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पत्रद्वारे इच्छमरणाची मागणी केली होती.

Agra farmer earns Rs 490 from potato crop, sends it to PM Modi in protest | '19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले

'19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले

लखनौ - उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील एका शेतकऱ्याला 19 हजार किलो (19 टन) बटाटा विकल्यानंतर केवळ 490 रुपये मिळाले आहेत. या घटनेमुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने मिळालेली संपूर्ण रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनी ऑर्डर केली आहे. आग्र्याच्या बरौली अहीर परिसरातील नाथू गावचे पीडित शेतकरी प्रदीप शर्मा यांच्याबाबतीत ही घटना घडल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. शेतकरी प्रदीप शर्मा यांनी पीकवीमा संदर्भात अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कांद्यानंतर आता बटाट्याच्या दरामुळेही शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचं दिसत आहे. 

बटाट्याचे पीक घेताना मला दरवर्षी मोठे नुकसान होते. त्यामुळेच मी जुलै महिन्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पत्रद्वारे इच्छमरणाची मागणी केली होती. मात्र, याबाबत मला कुठलेही उत्तर मिळाले नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. शर्मा यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींना मनी ऑर्डर केल्यानंतर पोस्ट विभागातून पावतीही घेतली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दीडपट वाढ करण्याचे वचन दिले होते. मात्र, कृषी खात्यातील भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना सर्वच सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याचे शर्मा यांनी म्हटले. 

दरम्यान, यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील संजय साठे या शेतकऱ्याने कांद्याला भाव न मिळाल्याने मोदींना मनी ऑर्डर करुन पैसे पाठवले होते. साठे यांना 1.40 रुपेय प्रतिकिलो याप्रमाणे 750 किलो कांद्याचे 1064 रुपये मिळाले होते. त्यानंतर, साठे यांनी ते पैसे मोदींना मनी ऑर्डर केले होते. 
 

Web Title: Agra farmer earns Rs 490 from potato crop, sends it to PM Modi in protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.