80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:38 PM2024-02-16T21:38:59+5:302024-02-16T21:39:27+5:30

या प्रकरणाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.

80-year-old husband and 76-year-old wife...couple divorce after 50 years of marriage | 80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट

80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट

अलीगढ: उत्तर प्रदेशातील अलीगढमधून घटस्फोटाचे आगळेवेगळे प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या 50 वर्षांनंतर एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. याप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने निकाल देताना 80 वर्षीय पतीला 76 वर्षांच्या पत्नीला खर्चासाठी दरमहा 5 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. त्यांचे नाते अबाधित राहावे यासाठी समुपदेशनही करण्यात आले, मात्र दोघेही पती-पत्नी वेगळे राहण्यावर ठाम होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा सत्र न्यायालय अलीगढमधील अतिरिक्त न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय ज्योती सिंह यांच्या न्यायालयाने वृद्ध पती-पत्नीमधील घटस्फोट प्रकरणात हा निकाल दिला आहे. लग्नाच्या 50 वर्षांनंतर या वृद्ध जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात वृद्ध जोडप्याच्या आयुष्याचा धागा अधिक घट्ट होतो असे म्हणतात, पण अलीगढमध्ये याउलट चित्र पाहायला मिळाले आहे.

2018 मध्ये कोतवाली बन्नादेवी परिसरातील रिसाल नगरमध्ये राहणाऱ्या 76 वर्षीय गायत्री देवी यांनी 80 वर्षीय मुनेश गुप्ता यांच्या विरोधात कोर्टात मेन्टेनन्सबाबत केस दाखल केली होती. किरण देवी यांनी आपल्या अपीलात न्यायालयाला सांगितले की, त्यांचा विवाह 25 मे 1972 रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. त्यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत. लग्नानंतर पतीच्या वागण्यात हळूहळू बदल होत गेला. बरेच दिवस पतीचे वागणे सहन केले, मात्र नंतर ते वेगळे राहू लागले.

पत्नीने मागितला न्याय 
80 वर्षीय पती मुनेश गुप्ता यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपी पतीविरुद्ध समन्स बजावले आणि त्याला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. मुनेश हजर झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले. तपासाअंती न्यायालयाने दोघांनाही समुपदेशनासाठी पाठवले, तेथे वकील आणि समुपदेशक योगेश सारस्वत यांनी वृद्ध पती-पत्नीला खूप समजावून सांगितले.

मालमत्तेबाबत वाद 
समुपदेशनादरम्यान पती मुनेशने कोणत्याही परिस्थितीत आपल्या वृद्ध पत्नीला पेन्शनमधून पैसे देण्यास नकार दिला. समुपदेशन संपल्यानंतर मुनेश यांच्या विरोधात निकाल देताना न्यायालयाने त्यांच्या निवृत्ती वेतनातून दरमहा 5 हजार रुपये वृद्ध पत्नी गायत्री देवी यांना देण्याचे आदेश दिले. पती मुनेश हे आरोग्य विभागातील पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या त्यांना सुमारे 35 हजार रुपये पेन्शन मिळते. पती मुनेश मोठ्या मुलासोबत तर पत्नी लहान मुलासोबत राहते. मुनेश यांना त्यांच्या लहान मुलाला मालमत्तेत कोणताही वाटा द्यायचा नाही.

Web Title: 80-year-old husband and 76-year-old wife...couple divorce after 50 years of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.