ममदापूर परिसरात पाणीटंचाई : टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:16 AM2018-03-27T00:16:11+5:302018-03-27T00:16:11+5:30

Water shortage in Mamdapur area: Disgruntled villagers due to non-availability of the tanker | ममदापूर परिसरात पाणीटंचाई : टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

ममदापूर परिसरात पाणीटंचाई : टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

Next

ममदापूर : येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी करूनदेखील अद्यापपर्यंत टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे गावाशेजारी असलेला बंधारा जानेवारी महिन्यात कोरडा पडल्याने बंधाऱ्याशेजारी असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या दोन्ही विहिरीत पाणी नसल्याने गावातील ग्रामस्थांना एकाच हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. पिण्यासह वापरण्याच्या पाण्यासाठी हातपंपावर गर्दी वाढल्याकारणाने रात्रीच नंबर धरून पाणी भरावे लागत आहे, तर काही कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वाडी-वस्तीकडे पाणी कमी असल्याने बºर्याच ठिकाणाहून रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असल्याने सर्व स्तरातून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध केला जात आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
टॅँकर मागणी करून दीड महिना उलटला तरी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाहणीदेखील केलेली नसून प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकला की काय, असा प्रश्न ममदापूर येथील ग्रामस्थांना पडला आहे. सरपंच, ग्रामसेवक यांना पाण्याचा टॅँकर कधी सुरू होणार अशी विचारणा केली असता उद्या सकाळी टॅँकर येणार एवढेच सांगण्यात येते. मग हा उद्या उगवणार तरी केव्हा, हाच प्रश्न ममदापूरमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने हंडा मोर्चा किंवा रास्ता रोको आंदोलनाच्या पवित्र्यात परिसरातील ग्रामस्थ आहेत.

Web Title: Water shortage in Mamdapur area: Disgruntled villagers due to non-availability of the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी