कोरोनामुळे दक्षता : घराघरांत नमाजपठण; साधेपणाने ईद साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 04:33 PM2020-05-25T16:33:14+5:302020-05-25T16:38:19+5:30

कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले.

Vigilance due to corona: Praying at home; Simply celebrate Eid | कोरोनामुळे दक्षता : घराघरांत नमाजपठण; साधेपणाने ईद साजरी

कोरोनामुळे दक्षता : घराघरांत नमाजपठण; साधेपणाने ईद साजरी

Next
ठळक मुद्देईदगाह मैदान गजबजलेच नाही‘डिस्टन्स’ राखून दिल्या शुभेच्छादरवळला शिरखुर्म्याचा सुगंध

नाशिक : मानवजातीला समता, बंधुभाव आणि माणुसकीची शिकवण देणारा सण रमजान ईद सोमवारी (दि.२५) शहरात साजरी करण्यात आली. यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे फारसा उत्साह पहावयास मिळाला नाही. सालाबादप्रमाणे गजबजणारे ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदान यंदा ओस पडलेले दिसून आले. सामुहिक नमाजपठणाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून रद्द करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांतच नमाज, फातिहापठण करून साधेपणाने ईद साजरी केली.

‘ईद-ऊल फित्र’ अर्थात रमजान ईद आज सर्वत्र साजरी झाली; मात्र कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. सामुहिक नमाजपठण टाळत नागरिकांनी घरांमध्येच नमाज अदा केली.
समाजबांधवांची सकाळपासून कोठेही रेलचेल पहावयास मिळाली नाही. ईदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. शहरासह सर्वच उपनगरांमध्येही लॉकडाउन नियमांचे व जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे पुर्णपणे पालन करण्यात आले. कुठल्याही मशिदीच्या आवारात समाजबांधव जमले नाही.
सकाळी सात वाजता सर्वच उपनगरीय मशिदींमधून समाजबांधवांना उद्देशून धर्मगुरूंनी ध्वनिक्षेपकांद्वारे ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. तसेच घरांमध्ये कोणत्या नमाजचे व कसे पठण करावे, याबाबत माहिती समजावून देत राज्य सरकारच्या वतीने जिल्हा व पोलीस प्रशासनाने के लेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. यामुळे सकाळी मुस्लीमबहुल भागातसुध्दा फारशी लक्षवेधी लगबग दिसून आली नाही. युवकांनीदेखील संयम बाळगत धर्मगुरूंच्या आवाहनाला साद दिली.
शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर होणारा नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी ईदच्या पुर्वसंध्येलाच रद्द केल्याचे जाहीर केले होते. यामुळे यंदा ईदगाहवर केवळ पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात असल्याचे चित्र पहावयास मिळाले. गेल्या वर्षी पावसाचे सावट असतानाही रमजान ईदनिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी ईदगाहच्या मैदानात सामुहिकरित्या नमाज अदा केली होती. यंदा मात्र कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दी टाळल्याने शहर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

...मशिदीही ‘लॉकडाउन’
ईदगाह मैदानासह सर्वच मुस्लीमबहुल भागासह उपनगरांमधील लहान-मोठ्या मशिदी मागील दोन महिन्यांपासून ‘लॉकडाउन’ आहे. ईदच्या पवित्र दिवशीही मशिदींमध्ये कोणीही सामुहिक नमाजपठणाकरिता गर्दी केली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी धार्मिक भावनांना आवर घालत अगदी संयमाने समाजबांधवांनी आपापल्या घरांमध्ये ईद साजरी केली.
-

Web Title: Vigilance due to corona: Praying at home; Simply celebrate Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.