सभापती आडकेंच्या नकारघंटेने भाजपात अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:43 AM2018-09-26T00:43:31+5:302018-09-26T00:43:58+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य एकट्या भाजपाचे असताना शिवसेनेचा लटका विरोध अत्यंत गांभीर्याने घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला रोखल्याने भाजपांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे.

Uncertainty in the BJP due to the dissolution of the Speaker | सभापती आडकेंच्या नकारघंटेने भाजपात अस्वस्थता

सभापती आडकेंच्या नकारघंटेने भाजपात अस्वस्थता

Next

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य एकट्या भाजपाचे असताना शिवसेनेचा लटका विरोध अत्यंत गांभीर्याने घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला रोखल्याने भाजपांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. खुद्द फरांदे या विषयावर नाराज असल्याचे वृत्त आहे तर सभागृह नेता दिनकर पाटील यांनी सदरचा विषय पक्ष बैठकीत मंजूर करण्याचे ठरले होते त्यानुसार आग्रह धरल्याची बाजू आमदारांकडे मांडली आहे. त्यामुळे सभापती हिमगौरी आडके यांची कार्यपद्धती आणखीनच पक्षाच्या दृष्टीनेदेखील अडचणीत वाढ करणारी ठरली आहे.  मध्य नाशिकमध्ये महिला रुग्णालयाचा विषय आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यांना भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या जवळ वाहनतळाच्या जागेत हे रुग्णालय साकारण्याचे निश्चित झाले होते तसा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र माजी आमदार वसंत गिते यांच्या समर्थकांनी त्यास विरोध केल्याने गिते विरुद्ध फरांदे असा सामना रंगला होता. त्यानंतरही फरांदे या त्यासाठी आग्रही राहिल्याने अखेरीस महापालिकेकडून नाममात्र दराने आरक्षित जागा घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यास काही प्रमाणात विरोध केला आणि गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाला अडचण होईल काय आणि अन्य प्रश्न उपस्थित केले. या जागेवर रुग्णालय बांधण्यास स्थगिती आली, असेही सांगण्यात आले परंतु प्रशासनाने केलेल्या खुलाशानुसार स्थगिती नसल्याचेही स्पष्ट झाले. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असूनही मुशीर सय्यद यांनी महिला रुग्णालय त्या परिसरातील नागरिकांची गरज असल्याचे सांगून समर्थन दिले. दिनकर पाटील यांनीही हा विषय मंजूर करण्याची गरज असल्याचे सांगितले असताना हिमगौरी आडके यांनी तो अभ्यासासाठी तहकूब ठेवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पक्षातील आमदारांच्या प्रतिष्ठेचा विषय बाजूला ठेवल्याने आडके यांची कामकाजाची वादग्रस्त पद्धतदेखील स्पष्ट झाली आहे. याच बैठकीत महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीला सर्वच सदस्यांनी कडाडून विरोध केला असताना त्यांनी दिलासादायक पद्धतीने दरही कमी केले नाहीत आणि दुसरीकडे मात्र पक्षाच्या आमदारांचा प्रस्ताव झिडकारून आमदारांनाच आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात समितीचे एक सदस्य दिनकर पाटील यांनी आमदार फरांदे यांच्याकडे बाजू मांडली असून, पक्ष बैठकीत हा विषय मंजूर करण्याचे ठरले असतानादेखील आडके यांनी अगोदरच हा विषय नामंजूर करण्याचे विषयपत्रिकेवर लिहून आणले होते. त्याचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे आडके यांनी ठरवून आमदारांच्या विषयांना खोडा घातल्याची चर्चा होऊ लागली आहे.
पाटील यांचा आडके यांना घरचा आहेर..
स्थायी समिती आणि महासभेत विषय मंजूर होतात, परंतु त्याचे इतिवृत्त होण्याच्या आतच अंमलबजावणीदेखील सुरू होते. त्यास सभागृह नेते दिनकर पाटील यांनी विरोध करून भाजपाला आणि विशेष करून सभापती हिमगौरी आडके यांना घरचा आहेर दिला आहे. यापुढे अशाप्रकारे निदर्शनास आल्यास प्रशासन जबाबदार राहील व कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे पाटील यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
यापूर्वी कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातील
रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा विशेषाधिकार आयुक्तांनी वापरून स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी केवळ विषय मंजूर झाल्यांनतर इतिवृत्त मंजुरीची वाट न बघता आयुक्तांनी अधिसूचना जारी केली होती. त्यावेळीच पाटील
यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळेच आता त्यांनी आडके आणि मुंढे या दोघांना
एकाचवेळी अडचणीत आणण्याची तयारी सुरू केली आहे.

Web Title: Uncertainty in the BJP due to the dissolution of the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.