Nashik: अल्पभूधारक शेतकरी कन्येची देशाच्या राजधानीत गगनभरारी

By Suyog.joshi | Published: March 22, 2024 07:33 PM2024-03-22T19:33:19+5:302024-03-22T19:34:04+5:30

Nashik News: समाजाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवर युवकांकडून चर्चा व्हावी व लोकशाहीला मजबुती देण्यासाठी भारत सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयाद्वारे दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा संसदेत नाशिक जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कन्येने भाग घेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

The daughter of a smallholder farmer is skyrocketing in the national capital | Nashik: अल्पभूधारक शेतकरी कन्येची देशाच्या राजधानीत गगनभरारी

Nashik: अल्पभूधारक शेतकरी कन्येची देशाच्या राजधानीत गगनभरारी

- सुयोग जोशी
नाशिक - समाजाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवर युवकांकडून चर्चा व्हावी व लोकशाहीला मजबुती देण्यासाठी भारत सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयाद्वारे दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा संसदेत नाशिक जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कन्येने भाग घेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. कु. सुहानी कारभारी आहेर असे तिचे नाव आहे.

मूळची देवळा येथील अल्प भू धारक शेतकरी कन्या तथा कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची ती विद्यार्थिनी आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, क्रीडा व युवा मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते सुहानीचा सत्कार करण्यात आला. 

 यातील निवड प्रक्रीया ही अतिशय कठीण व गुंतागुंतीची होती. प्रत्येक जिल्हास्तरावरुन केवळ तिघांची राज्यस्तर निवड झाली. व देशातील २८ राज्ये व दोन केंद्रशासीत प्रदेशातून ७८ प्रतिनिधींची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली होती. के. के. वाघ महाविद्यालयाच्या सुहानी या विद्यार्थीनीने सदर निवड प्रक्रीयेतुन योग्य तो सहभाग नोंदवत राष्ट्रीय युवा संसदेपर्यंत झेप घेतली. सुहानी हिने महाराष्ट्र व गोवा राज्यांचे प्रतिनिधीत्व केले. संपूर्ण कार्यक्रम संसद भवन, नवी दिल्ली येथे पार पडला. तीन दिवसीय कार्यक्रमात देशाच्या संसंदेचे प्रत्यक्षात कामकाज पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली. नवीन संसंद भवन, लोकसभा व राज्यसभा यांना भेटी, पिठासीन अधिकारी व कर्मचारी वर्गासमवेत संवाद, केंद्रीय सचिवालयास भेट आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सुहानीला रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. मयुर उशिर यांनी मार्गदर्शन केले. सुहानीचा संपूर्ण प्रवास खर्च, निवास व भोजनाची व्यवस्था युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला होता. सुहानीच्या यशाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समिर बाळासाहेब वाघ, अजिंक्य वाघ, सरस्वतीनगर येथील वाघ शैक्षणिक संकुलाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य डॉ. संभाजी पाटील, उपप्राचार्या डॉ. अनुराधा नांदुरकर, विभागप्रमुख डॉ. अर्चना बेंडाळे, प्रा. अर्चना कोते यांनी कौतुक केले.  सुहानीमुळे संस्थेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीपर्यंत झाला असून, संस्थेला सुहानीचा व आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे असे यावेळी बोलतांना समीर वाघ यांनी सांगितले.
 
सरकारने उचलला खर्च
वडीलांचा पारंपरिक शेती व्यवसाय असून घरची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. घरात मी मोठी असून एक धाकटा भाऊ १० वीत शिकत आहे. ज्यावेळी दिल्ली येथील राष्ट्रीय युवा संसदेत जाण्याची मला संधी मिळाली तेव्हा सुरवातीला वडीलांनी खर्चाचा विचार करता नकार दिला होता. मात्र खर्चाचा सारा भार सरकार तर्फे उचलण्यात आल्याने वडीलांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला एकटीला येवढ्या दूरवर जाण्याची परवानगी दिली. आमच्या आहेर परिवाराचे, गावाचे व काॅलेजचे नाव देशाच्या राजधानीत लोकशाहीच्या सर्वोच्च कायदेमंडळात उंचावण्याची मला संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे.

Web Title: The daughter of a smallholder farmer is skyrocketing in the national capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.