जाखोडच्या पाण्यावरून तणाव

By admin | Published: November 25, 2015 11:51 PM2015-11-25T23:51:36+5:302015-11-25T23:52:15+5:30

पुन्हा पाणी रोखले : संतप्त ग्रामस्थांनी धरणाचा ताबा घेऊन सोडले पाणी

Tension on Jakhod water | जाखोडच्या पाण्यावरून तणाव

जाखोडच्या पाण्यावरून तणाव

Next

 सटाणा : तहानलेल्या करंजाडी खोऱ्यासाठी जाखोड धरणातून सोडलेले पाणी मंगळवारी मध्यरात्री पुन्हा मुंगसे, पिंगळवाडे येथील ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेला न जुमानता रोखून विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, मंगळवारी दुपारी करंजाड ते आनंदपूरपर्यंतच्या सात गावातील चारशे ते पाचशे संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने हल्लाबोल करत धरणाचा ताबा घेतला आणि धरणाचा दरवाजा उघडून पाणी सोडले. दरम्यान, जाखोडच्या पाण्यावरून गावागावत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार आनंदपूरपर्यंत आवर्तनाचे पाणी पोहचेपर्यंत धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी दुसऱ्यांदा पाणी रोखणाऱ्या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता पुन्हा पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री एक वाजेनंतर पोलिसांची पाठ फिरताच दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे बंद करून पाणी रोखले. धरणखालच्या या दोन्ही गावांच्या भूमिकेमुळे संतापाची लाट उसळून सुमारे चारशे ते पाचशेच्या संतप्त जमावाने मिळेल त्या वाहनाने थेट धरणावर हल्लाबोल करून ताबाच घेतला.
यावेळी पाणी सोडून जमावाने घोषणा देत पाणी रोखणाऱ्यांना थेट आव्हान दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने शेवटच्या टोकाला पाणी पोहचेपर्यंत धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यावेळी अभियंता शिवाजी अहिरे, अशोक काकुळते, निकम यांच्यासह माधवराव दिघावकर, अशोक देवरे, संजय देवरे, वसंत पवार, बापू देवरे, राजेंद्र जाधव, बळीराम जाधव, रामभाऊ देवरे, प्रभाकर देवरे, पप्पू पवार, पोपट जाधव, किशोर ह्याळीज, साहेबराव खैरनार, कृष्णा जाधव, दिलीप शेवाळे, राकेश देवरे, विजय देवरे यांच्यासह चारशे ते पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Tension on Jakhod water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.