सुरेशदादा तळवलकर यांच्या झपतालाने श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:38 AM2018-04-29T00:38:14+5:302018-04-29T00:38:14+5:30

सतारीच्या सुरांना लाभलेली संवादिनी अन् तबल्याच्या साथीने एकापेक्षा एक सरस राग सादरीकरणाने रंगलेल्या आवर्तन संगीत सोहळ्यात पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांनी आपल्या खास शैलित सादर केलेल्या झपतालाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

Sureshd Talwalkar jhapatalana listeners charmed | सुरेशदादा तळवलकर यांच्या झपतालाने श्रोते मंत्रमुग्ध

सुरेशदादा तळवलकर यांच्या झपतालाने श्रोते मंत्रमुग्ध

Next

नाशिक : सतारीच्या सुरांना लाभलेली संवादिनी अन् तबल्याच्या साथीने एकापेक्षा एक सरस राग सादरीकरणाने रंगलेल्या आवर्तन संगीत सोहळ्यात पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांनी आपल्या खास शैलित सादर केलेल्या झपतालाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  निमित्त होते, श्री गुरुकृपा तबला अकादमी व एसडब्ल्यूएस फायनान्सियल सोल्युशनच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील शंकराचार्य सभागृहात दोन दिवसीय ‘आवर्तन’ या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन शनिवारी (दि.२८) सकाळी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळवलकर, पंडित विजूकाका हिंगणे, पंडित कमलाकर वारे, अविराज तायडे, जयंत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रात वादक स्वीकार कट्टी यांनी सतारवादनातून ‘मियां की तोडी’ हा शास्त्रीय संगीतामधील राग खास शैलित सादर केला. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली. त्यानंतर पं. योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव यांनी एकल तबलावादनातून तीनतालात पेशकार कायदे व बंदिशी सादर केल्या. संध्याकाळच्या सत्राचा प्रारंभ अकादमीच्या विद्यार्थ्यांनी तबल्याच्या सहवादनाने केला. विद्यार्थ्यांनी यावेळी तीनताल सादर केला. तळवलकर यांनी त्यांचे सहकारी सावनी तळवलकर-गाडगीळ, नागेश आडगावकर, मिलिंद कुलकर्णी, ओंकार दळवी यांच्या साथीने झपताल सादर केला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सुरेशदादा तळवलकर यांच्या या प्रस्तूतीला उत्स्फूर्त दाद दिली.
आज बनारस घराण्याचे तबलावादन
रविवारी (दि.२९) सकाळी पहिल्या सत्रात बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला सम्राट पंडित किशन महाराज यांचे नातू शुभ महाराज हे एकल तबलावादन सादर करणार आहे. आवर्तनाच्या दुसऱ्या अन् अखेरच्या सत्राचा समारोप दिल्लीचे उस्ताद राशीद मुस्तफा व शारीक मुस्तफा यांच्या तबला वादनाने होणार आहे.

Web Title: Sureshd Talwalkar jhapatalana listeners charmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक