भाजपाचा परवेज कोकणी यांना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:01 AM2018-05-16T00:01:04+5:302018-05-16T00:01:04+5:30

Support of BJP's Parvez Kokani | भाजपाचा परवेज कोकणी यांना पाठिंबा

भाजपाचा परवेज कोकणी यांना पाठिंबा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत चर्चा भाजपालाही निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली

नाशिक : लोकसभेच्या पालघर येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वणगा यांची उमेदवारी कायम ठेवण्याबरोबरच पलूस विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे विश्वजित कदम यांना एकतर्फी पाठिंबा घोषित करून भारतीय जनता पक्षाच्या केलेल्या राजकीय कोंडीचा हिशेब चुकता करण्यासाठी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांना भाजपाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त असून, त्यासाठी उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुप्त खलबते सुरू होती.
नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघात गेल्या आठ दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेऊन शिवसेनेच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. नाशिक भेटीवर येऊन गेलेले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील त्यावर भाष्य करण्याऐवजी शिवसेनेलाच युतीधर्म पाळण्याचे सल्ले दिले होते. भाजपाची भूमिका स्पष्ट होत नसल्यामुळे नरेंद्र दराडे व परवेज कोकणी यांना ‘कभी खुशी कभी गम’चा अनुभव घ्यावा लागत होता.
मंगळवारी दुपारी भाजपाच्या जिल्ह्यातील सर्व नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना तातडीने मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दुपारी मिळेल त्या वाहनाने नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मुंबईला रवाना झाले असून, मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी अगोदर पालकमंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन त्यात त्यांची मते आजमावण्यात आल्याचे सांगण्यात आले व विशेष म्हणजे या बैठकीसाठी जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण भाजपाने दिल्यामुळे यासंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट दिसू लागली आहे. अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोकणी यांच्या नामांकन अर्जावर भाजपा नगरसेवकांनी सूचक म्हणून केलेल्या स्वाक्षऱ्या व पक्षाच्या पदाधिकाºयांनी कोकणी यांच्या प्रचारात घेतलेला सहभाग पाहता त्यांच्या उमेदवारीला भाजपाचा छुपा पाठिंबा असल्याचे मानले जात होते. त्यातच शिवसेनेने पालघरमध्ये उमेदवारी कायम ठेवल्यामुळे आता भाजपालाही निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

Web Title: Support of BJP's Parvez Kokani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा