Suicides by a young farmer in Nashik district | नाशिक जिल्ह्यात कर्जबाजारी तरूण शेतक-याची आत्महत्या
नाशिक जिल्ह्यात कर्जबाजारी तरूण शेतक-याची आत्महत्या

ठळक मुद्देसत्र कायम : संख्या चौदाच्या घरात गेल्या वर्षी जिल्ह्यात १०५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या

नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापुर येथे तरूण शेतक-याने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
साईनाथ भागिनाथ शिंदे (२९) असे या शेतक-याचे नाव असून, रविवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरातच विषारी औषध सेवन केले. शिंदे याच्या नावावर ममदापुर येथे गट नंबर ८०७ मध्ये २.६३ हेक्टर शेतजमीन आहे. त्याच्या नावे कर्ज आहे काय याचा शोध घेतला जात आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणेच दरमहा सात ते आठ शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून गेल्या दोन महिन्यात तेरा शेतक-यांनी आत्महत्या केली तर मार्च महिन्यात पहिली आत्महत्या झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात १०५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतक-यांना कर्जमाफी योजना जाहीर करून दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले तरी देखील आत्महत्येचे प्रमाण कायम राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.