नरेंद्र दराडे यांना शिवसेनेची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:42 AM2018-04-24T01:42:16+5:302018-04-24T01:42:16+5:30

Shiv Sena's candidature for Narendra Darade | नरेंद्र दराडे यांना शिवसेनेची उमेदवारी

नरेंद्र दराडे यांना शिवसेनेची उमेदवारी

googlenewsNext

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने सोमवारी नरेंद्र दराडे  यांची उमेदवारी एकतर्फी घोषित केल्यामुळे या निवडणुकीसाठी युती होण्याची अपेक्षा ठेवून असलेल्या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले असून, आता भाजपा यावर काय निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तथापि, सेनेने दराडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी, त्यांच्या उमेदवारीचे पहिजे त्या प्रमाणात स्थानिक सेनेत स्वागत न झाल्याने सेना नेतृत्वाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. सहा वर्षांपूर्वी सेना-भाजपाची युती असल्याने नाशिकची जागा शिवसेनेने लढविली होती. परंतु नंतरच्या काळात अनेक राजकीय उलथापालथी झाल्याने व शिवसेनेने भाजपाशी यापुढे युती न करण्याचे जाहीर केल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नेमके काय होईल, याविषयी शेवटच्या क्षणापर्यंत अटकळी बांधल्या जात असताना सोमवारी सेनेच्या मुखपत्रातून विधान परिषदेसाठी जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाल्याने भाजपा काय भूमिका घेते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. मात्र दराडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर स्थानिक सेनेत पाहिजे तशी उत्स्फूर्तता दिसून आली नाही. यापूर्वी विधान परिषदेच्या उमेदवारीवर दावा करणारे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने व त्यांनी सेनेच्या नेतृत्वावरच दोषारोप केल्यामुळे शिवसेनेतील गटबाजी लपून राहिलेली नाही. सहाणे यांची हकालपट्टी व सेनेतील खांदेपालट या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्यामुळे त्याचा परस्पराशी संबंध जोडला गेला आहे. पाठीशी कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना सेनेतील या गटबाजीच्या बळावरच सहाणे यांनी विधान परिषदेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा ठाम निर्णय जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी नरेंद्र दराडे यांना भेट देण्यास टाळाटाळ चालविली आहे. या सर्व घटना घडामोडी पाहता निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी दोन दिवस संपर्क नेते अजय चौधरी व उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशकात तळ ठोकण्याचा व ‘पॅचअप’ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, दि. २५ रोजी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टतील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक राऊत यांच्या उपस्थितीत बोलाविण्यात आली आहे.
‘राष्टवादी’कडून सावंत इच्छुक
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अशोक सावंत यांचे नाव पुढे आले असून, विद्यमान आमदार जयंत जाधव यांनी यापूर्वीच निवडणूक न लढविण्याचे जाहीर केल्याने बाहेरून आयात उमेदवार  देण्यापेक्षा सावंत यांनी उमेदवारी करण्यासाठी पक्षाकडून गळ घालण्यात आली व त्यांनीदेखील तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले आहे.  राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असल्याने दोन्ही कॉँग्रेसने यापूर्वीच आघाडी करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिक मतदार संघ राष्टÑवादी कॉँग्रेससाठीच सोडला जाणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून उमेदवाराचा शोध सुरू होता. शिवसेनेने उमेदवारीच्या कारणावरून हकालपट्टी केलेले व गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीचे प्रतिस्पर्धी असलेले शिवाजी सहाणे यांचाही पर्याय तपासून पाहण्यात आला होता. खुद्द सहाणे यांनीदेखील राष्टÑवादीच्या काही नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली होती. परंतु सहाणे यांना आयात करण्यापेक्षा स्वपक्षाचाच उमेदवार देण्याचा विचार पुढे आल्याने महापालिकेचे माजी शिक्षण सभापती अशोक सावंत यांचे नाव घेण्यात आले आहे. सावंत यांचे सर्वपक्षीय संबंध व आर्थिक सक्षमता पाहता अपक्षांच्या बळावर विधान परिषदेचे मैदान मारणे त्यांना सहज शक्य होणार आहे. शिवाय या निवडणुकीत शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना एकतर्फी उमेदवारी घोषित केल्यामुळे भाजपाबरोबर त्यांची युती होण्याची शक्यता मावळली आहे. अशा परिस्थितीत तिरंगी लढत झाल्यास राष्ट्रवादी आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे सावंत यांनी बहुधा हाच विचार करून निवडणुकीसाठी आपला होकार कळविला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shiv Sena's candidature for Narendra Darade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.