जिल्ह्यात ४५ लाखांहून अधिक मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:43 AM2019-03-12T01:43:08+5:302019-03-12T01:43:25+5:30

उमेदवारांचे नामांकन भरण्याच्या दहा दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच ३० मार्चपर्यंत मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार असून, सध्या सुरू असलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत अंतिम मतदारांमध्ये ६० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात येत्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ४५ लाखांहून अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली.

The rights to play more than 45 lakh voters in the district | जिल्ह्यात ४५ लाखांहून अधिक मतदार बजावणार हक्क

जिल्ह्यात ४५ लाखांहून अधिक मतदार बजावणार हक्क

Next

नाशिक : उमेदवारांचे नामांकन भरण्याच्या दहा दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच ३० मार्चपर्यंत मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार असून, सध्या सुरू असलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत अंतिम मतदारांमध्ये ६० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात येत्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ४५ लाखांहून अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली. जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता जारी झाली असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल झाल्यास अवघ्या पंधरा मिनिटांत त्यावर कार्यवाही केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.  केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी या दोन लोकसभा व धुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, राजकीय पक्षांचे फलक, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे काढण्याच्या सूचना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत, तर लोकप्रतिनिधींचे शासकीय वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीचा राजकीय प्रचारासाठी वापर होऊ नये यासाठी दूरध्वनीची देयके न देण्याचे ठरविण्यात आले असल्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक पद्धतीने आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात ४४ लाख ४५ हजार ५५६ मतदारांचे अंतिम यादीत नावे असून, प्रत्यक्ष नामांकन अर्ज दाखल होईपर्यंत मतदार आपले नावे मतदार यादीत समाविष्ट करू शकतील. सध्या ६० हजार मतदारांचे नव्याने अर्ज आले आहेत, तर त्यातील दुबार नावे असलेल्या २५ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नवीन मतदारांची नोंदणी आॅनलाइन करता येईल किंवा मतदान केंद्राच्या बीएलओंमार्फत अर्ज सादर करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या मतदारांमध्ये २३ लाख ३२ हजार ५९० पुरुष, तर २१ लाख १२ हजार ८८३ महिला मतदार आहेत. सात अनिवासी भारतीय, तर ७६ तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यात ४,४४६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत, मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यास मतदान केंद्राच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. एका मतदान केंद्रावर १४०० पेक्षा कमी मतदार मतदान करू शकतील, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
आचारसंहिता अंमलबजावणीसाठी अ‍ॅपचा वापर
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सुविधा, सुगम, पीडब्ल्यूडी, सी-विजील यासारख्या अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. या वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना सोयी, सुविधा पुरविण्याबरोबरच आचारसंहितेच्या वापरासाठीदेखील उपयोग करून घेण्यात येणार आहे.
४ सी-विजील या अ‍ॅपच्या माध्यमातून कोणताही सामान्य व्यक्तीदेखील आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करू शकतो. आचारसंहिता भंग होत असल्याची माहिती, ध्वनिचित्रफित तो सी-विजील अ‍ॅपवर पाठवू शकतो, येत्या दोन दिवसांत सदरचे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात येणार असून, पाच मिनिटांत सदरची तक्रार या अ‍ॅपवर केल्यास अवघ्या पंधरा मिनिटांत त्याची दखल घेतली जाईल व कार्यवाही केली जाणार आहे.
४ दिव्यांग मतदारांसाठीदेखील सुविधा अ‍ॅप तयार करण्यात आले असून, जिल्ह्यात ९८०० दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांनी अ‍ॅपच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी आपली तक्रार नोंदविल्यास त्यांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याबरोबरच, मतदानाची संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार आहे. या मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, सहायक नेमण्यात आले आहेत.
 सुविधा अ‍ॅपच्या माध्यमातून मतदाराला आपले मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र क्रमांक, ठिकाण घरबसल्या समजणार आहे.
 १९५० टोल फ्री क्रमांकदेखील जिल्ह्यासाठी कार्यान्वित करण्यात आला असून, यात मतदाराला त्याला आवश्यक असलेली माहिती दिली जाणार आहे, शिवाय त्याची काही तक्रार असल्यास त्याचीदेखील दखल घेतली जाईल, तर तक्रारदाराने त्याच्या तक्रारीबरोबर त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास त्याच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहिती लघुसंदेशाद्वारे दिली जाणार आहे. जर तक्रारदार नाव गोपनीय ठेवू इच्छित असेल तर तसेही करता येणार आहे.
सोशल मीडियाच्या प्रचारावर लक्ष
निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश आयोगाने दिले असले तरी, प्रचारासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक, राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जाण्याची व विशेषत: सोशल मीडियाचा वापर केला जाण्याची शक्यता गृहीत धरून आयोगाने सोशल मीडियाच्या प्रचारावर लक्ष देण्याचे ठरविले आहे.
 ज्या उमेदवाराने नामांकन दाखल केल्यास त्याने त्याचवेळी तो वापरत असलेल्या सोशल मीडियाच्या अकाउंटची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 राजकीय पक्ष, उमेदवार वा त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचार करता येणार आहे, मात्र त्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, जातीय सलोखा भंग होणार नाही, उमेदवाराचे चारित्र्यहनन होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
 सोशल मीडियावर होणाºया प्रत्येक प्रचारावर सायबर कक्षामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असून, उमेदवाराकडून या माध्यमाचा वापर झाल्यास तो त्याच्या निवडणूक खर्चात धरण्यात येईल.
, त्यासाठी आयोगाचे मार्गदर्शन यथावकाश येईल.

Web Title: The rights to play more than 45 lakh voters in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.