रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्स उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:34 PM2019-06-16T23:34:13+5:302019-06-17T00:06:06+5:30

रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरात वीजपुरवठा पोहचविला जातो. त्या शहरातील पिलर्सची सध्याची परिस्थिती पाहिली, तर  ८० टक्के पिलर्स हे उघड्यावर आहेत. या पिलर्सच्या माध्यमातून परिसराचा विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे रहिवासी क्षेत्रातच हे पिलर्स असतात. मात्र हे पिलर्स मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त, पडझड झालेले तसेच उघड्यावर असल्याचे चित्र शहरात दृष्टीस पडते.

 Opening of the Mini Pillars along the roadside | रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्स उघड्यावर

रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्स उघड्यावर

Next

नाशिक : रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरात वीजपुरवठा पोहचविला जातो. त्या शहरातील पिलर्सची सध्याची परिस्थिती पाहिली, तर  ८० टक्के पिलर्स हे उघड्यावर आहेत. या पिलर्सच्या माध्यमातून परिसराचा विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे रहिवासी क्षेत्रातच हे पिलर्स असतात. मात्र हे पिलर्स मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त, पडझड झालेले तसेच उघड्यावर असल्याचे चित्र शहरात दृष्टीस पडते.
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. त्यामुळे ही सेवा सुरळीत राहण्यासाठी महावितरणला मोठे काम करावे लागते. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि विद्युत यंत्रणेची हानी कमी करण्यासाठी व्यापक कामे केली असल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला तरी पावसाळ्यात त्यांचा हा दावा फोल ठरतो.
रोहित्रामध्ये बिघाड होण्याचे प्रमाण पावसाळ्यात सर्वाधिक असते. त्याची कारणे काहीही असली तरी जबाबदारी मात्र महावितरणची आहे. रोहित्राच्या बिघाडामुळे मिनी पिर्लस, फिडर्स पिलर्सचमध्ये तत्काळ दोेष निर्माणही होत असतो. हा दोष दूर करणे आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणेचे जाळे खुले करणे यात बराच वेळ जातो त्यातून ग्राहकांना दीर्घकाळ विजेपासून वंचित रहावे लागते.
नाशिक शहर- १ अंतर्गत सुमारे साडेतीन हजार मिनी पिलर्स आहेत, तर शहर-२ अंतर्गत सुमारे चार हजार मिनी पिलर्स आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मिनी पिलर्सच्या काळजी घेणे महावितरणच्या आवाक्याबाहेर जाते. मिनी पिलर्सचे झाकणे चोरीला जाण्याच्या प्रकारामुळे मिनी पिलर्स उघड्यावर पडल्याचे दिसते. या चोऱ्यांना आळा घालणे आणि प्रत्येक ठिकाणी बारदानाचे आवरण लावून तात्पुरती डागडुजी करणे हे कामही सोपे नसल्याने उघड्यावरील मिनी पिलर्सचा धोका कायम आहे.ं
मिनी पिलर्सची झाकणे चोरीस
घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा ज्या मिनी पिलर्सच्या माध्यमातून केला जातो ते रस्त्याच्या कडेला असतात. परंतु भुरटे चोर तसेच काही भंगार विक्रेते मिनी पिलर्सचे पत्र्याचे दरवाजे चोरून नेत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. हजारोंच्या संख्येने असलेल्या मिनी पिलर्सचवर चोरट्यांचा डोळा असल्याने अनेक ठिकाणी तोडफोडदेखील झालेली आहे. मिनी पिलर्सचा दरवाजा काढून नेल्याचे महावितरणच्या लक्षात आल्यानंतर अशा ठिकाणी तात्पूरच्या स्वरूपात बारदान, प्लॅस्टिक तसेच लाकडी फळ्यांच्या साह्याने पिलर्स झाकले जाते. कारण आतमध्ये विद्युत प्रवाह सुरूच असतो. त्यातील एखाद्या जरी फ्यूजला हात लागला तरी विजेचा झटका बसू शकतो.
झाकणे चोरी करून नेण्याचा प्रकार आजचा नाही. गेली कित्येक वर्षांपासून महावितरणला या भुरट्या चोरीने वैतागून सोडले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता फायबर्सची झाकणे वापरली जात आहेत. या उपक्रमाला आता सुरुवात झाली असून, उघड्या मिनी पिलर्सला आवरण चढविले जात आहे.
विस्कळीत प्रणाली व दुरुस्तीची कामे
वीजतारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लॅक्स बॅनर्स, प्लॅस्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. पावसाळापूर्व कामांमध्ये सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.
वीज उपकेंद्रातील रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलिका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलण्यात येत आहे. वीज वितरण यंत्रणेत आर्थिंगचे महत्त्व अधिक आहे; याकरिता रोहित्रांचे आर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर  पिलर्स या सर्वांचे आर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
आपत्कालीन यंत्रणा आणि फिडर
दुसरी बाब म्हणजे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे किंवा विद्युतप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होऊन फिडर (वीजवाहिनी) बंद पडते, जर हा फिडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.
जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते.

Web Title:  Opening of the Mini Pillars along the roadside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.