नाशिक महापालिकेत सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा बहरणार ‘पुष्पोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 08:14 PM2018-01-16T20:14:29+5:302018-01-16T20:16:20+5:30

पुष्पप्रेमींसाठी पर्वणी : उद्यान विभागाकडून तयारी सुरू

  Nashik Municipal Corporation's 'Pushpotsav' will grow again after seven years | नाशिक महापालिकेत सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा बहरणार ‘पुष्पोत्सव’

नाशिक महापालिकेत सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा बहरणार ‘पुष्पोत्सव’

googlenewsNext
ठळक मुद्देफेबु्रवारीच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याचा महापालिकेचा विचारसदरचा उपक्रम २०१० पासून बंद पडला

नाशिक - महापालिकेतील राजीव गांधी भवनच्या चार मजली इमारतीत सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा ‘पुष्पोत्सव’ बहरणार असून उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागामार्फत त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. फेबु्रवारीच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
एकेकाळी फुलांचे शहर गुलशनाबाद म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नाशकात १९९३ पासून महापालिकेच्यावतीने मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या इमारतीत पुष्पोत्सवाचे आयोजन केले जात होते. या पुष्पोत्सवात पुष्परचना, पुष्परांगोळी, गुलाब राजा, गुलाब राणी, गुलाब राजकुमार-राजकुमारी यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबरच बंगलो गार्डन स्पर्धाही भरविली जात असे. पुष्पोत्सव पाहण्यासाठी अवघे नाशिक राजीव गांधीभवनच्या इमारतीत पायधूळ झाडायचे. पुष्पोत्सवात सुमारे २ हजाराहून अधिक फुले, झाडांचे प्रकार पाहायला मिळायचे. बोन्साय, कॅक्टस, इनडोअर-आऊटडोअर प्लॅन्टिंग ह्यांचे कमालीचे आकर्षण असायचे. याशिवाय, या महोत्सवात बागकामासाठी लागणारे साहित्य, अवजारेही उपलब्ध करून द्यायची. परंतु, सदरचा उपक्रम २०१० पासून बंद पडला. गेल्या सात वर्षांत उद्यान विभाग नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिला. उद्यान अधिक्षकाला गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आले. त्यामुळे सदरचा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात लोकप्रतिनिधींनीही उत्साह दाखविला नाही. आता महापालिकेत सत्ताधारी भाजपाने सात वर्षांच्या खंडानंतर पुन्हा पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेतही संदीप भवर यांनी त्याबाबतचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी उद्यान विभागाने चालविली आहे.
पुष्पोत्सव एक पर्वणी
पहिल्या पुष्पमहोत्सवाचे उद्घाटन रंगभूमीवर खास फुलराणी म्हणून संबोधिल्या जाणा-या भक्ती बर्वे-इनामदार यांच्या हस्ते झाले होते तर त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील आघाडीच्या नायिका निशिगंधा वाड, अलका कुबल, आसावरी जोशी, सुप्रिया पिळगांवकर, तनुजा, गायिका अनुराधा पौडवाल तसेच श्रीधर फडके, किशोर कदम, अशोक नायगावकर यांनी हजेरी लावली होती. पुष्पोत्सव नेहमीच नाशिककरांसाठी पर्वणी राहिली.

 

Web Title:   Nashik Municipal Corporation's 'Pushpotsav' will grow again after seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.