Nashik Agriculture Produce Market Committee: After throwing down prices, farmers threw cilantro | नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : भाव घसरल्याने शेतक-यांनी कोथिंबीर फेकली

ठळक मुद्देसध्या पालेभाज्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोथिंबीरची आवक वाढली आहे.लिलावात कोथिंबीरला अवघा एक रुपया जुडी असा भाव

नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतक-यांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतक-यांनी  आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेला. लिलावात कोथिंबीरला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओखी वादळामुळे मुंबईत शेतमालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झालेला होता. मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान व त्यातच पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने मंगळवारी शेतमालाला कमी प्रमाणात उठाव असल्याने नाशिक बाजार समितीत बाजारभाव घसरलेले होते.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई शहर तसेच उपनगरात दैनंदिन मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची निर्यात केली जात असते. मंगळवारी सायंकाळी मेथी भाजी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेली होती, परंतु मुंबईला पाऊस असल्याने तसेच शेतमालाला उठाव नसल्याने मेथीला मातीमोल बाजारभाव होता. सध्या पालेभाज्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोथिंबीरची आवक वाढली आहे.
काही दिवसांंपूर्वी सुमारे २७५ रुपये असा विक्र मी बाजारभाव गाठून सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणा-या कोथिंबीरचे बाजारभाव गुरुवारी पूर्णपणे घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. मात्र चांगला बाजारभाव न मिळाल्याने कोथिंबीर उत्पादन करणा-या शेतकरी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत काढता पाय घेतला. नाशिकमधून मुंबईला कोथिंबीर माल रवाना करण्यात आला मात्र पुणे, खेड, मंचर या भागातील कोथिंबीर मुंबई बाजारात दाखल होत असल्याने तसेच गुजरात राज्यातही स्थानिक कोथिंबीर माल दाखल होत असल्याने गुजरातची निर्यात थांबली आहे. परिणामी उठाव कमी झाल्याने बाजारभाव ढासळले आहेत.