सामूहिक नमाजपठण ; बकरी ईद उत्साहात  साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:00 AM2018-08-23T01:00:20+5:302018-08-23T01:01:10+5:30

: त्याग, समर्पण व बंधुभावाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा दुसरा महान सण ईद-ऊल-अज्हा अर्थात बकरी ईद बुधवारी (दि. २२) नाशिक शहरासह जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात  आली.

Mass memorandum; Celebrating Bakery Id | सामूहिक नमाजपठण ; बकरी ईद उत्साहात  साजरी

सामूहिक नमाजपठण ; बकरी ईद उत्साहात  साजरी

Next

नाशिक : त्याग, समर्पण व बंधुभावाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा दुसरा महान सण ईद-ऊल-अज्हा अर्थात बकरी ईद बुधवारी (दि. २२) नाशिक शहरासह जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात  आली.  पावसाने सकाळी उघडीप दिली होती, त्यामुळे मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने ऐतिहासिक शहाजहॉँनी इदगाह मैदानावर सामुदायिकरीत्या नमाजपठण केले. देश बळकट करण्यासाठी एकात्मता अधिकाधिक जोपासण्याची गरज आहे, असा संदेश शहर-ए-खतीब हिसामुद्दीन यांनी यावेळी दिला. 
दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने ईदगाह मैदानावर नमाजपठणाचा सोहळा होईल की नाही, याबाबत संभ्रम होता; मात्र पुर्वसंध्येलाच हिसामुद्दीन अशरफी, हाजी मीर मुख्तार अशरफी यांनी पाहणी करुन नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार बुधवारी सकाळी आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांची पावले इदगाह मैदानाच्या दिशेने वळू लागली होती. सकाळी हलक्या सरींचा काही मिनिटे वर्षाव झाला; मात्र त्यानंतर चक्क सूर्यप्रकाश पडल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला. अधूनमधून सूर्यप्रकाशाची किरणे अन् पुन्हा ढगांची गर्दी, रिमझिम वर्षाव आणि थंड वारा अशा आल्हाददायक नैसर्गिक वातावरणात उपस्थित शेकडो बांधवांनी ईदचे नमाजपठण केले.  प्रारंभी साडेनऊ वाजता धर्मगुरू मौलाना महेबुब आलम यांनी प्रवचनातून बकरी ईदची पार्श्वभूमी आणि महत्त्व विशद केले. त्यानंतर खतीब यांनी उपस्थितांना ईदच्या विशेष नमाजपठणाची पद्धत नेहमीप्रमाणे समजावून दिली. दहा वाजून पाच मिनिटाला नमाजपठणाला सुरुवात झाली. पंधरा ते वीस मिनिटांत नमाजपठण पूर्ण झाले. त्यानंतर खतीब यांनी ईदचा विशेष ‘खुतबा’ अरबी भाषेतून वाचला. मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली. त्यांना ‘आमीन’ म्हणत उपस्थितांनी होकार दिला. इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामूहिक पठण केले. साडेदहा वाजता सोहळ्याची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन इदगाह समितीचे कार्यवाह हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले.
पारंपरिक पोशाखासह रेनकोट अन् छत्री
पारंपरिक पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी असा पारंपरिक पोशाख परिधान क रून मैदानावर हजेरी लावली. यावेळी पावसाची शक्यता असल्याचे गृहित धरून आबालवृद्धांनी रेनकोट, छत्री, मैदानावर बसण्यासाठी पाणकापड, चटईदेखील सोबत घेतली होती. प्रवचनादरम्यान हलक्या सरींचा वर्षाव सुरू होताच मैदानावरील नागरिकांनी छत्र्यांचा आधार घेतला.
मुस्लिमांचा ‘केरळ’ला मदतीचा हात
देशभरात कोठेही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास तेथील रहिवाशांना मदतीचा हात देण्यासाठी नाशिकच्या मुस्लीम समुदायाने सय्यद सादिकशाह हुसेनी रिलिफ फंड नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून केरळ पूरग्रस्तांसाठी नमाजपठणाच्या सोहळ्यादरम्यान इदगाहवर मदतनिधी उभारण्यात आला. नमाजपठणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक स्वरूपात दान दिले.
विदेशी पाहुण्यांचाही सहभाग
इदगाह मैदानावर नमाजपठण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधील सहा युवक उपस्थित झाले होते. शहरात सध्या एका सर्कसचे दैनंदिन खेळ सुरू आहेत. या सर्कसमध्ये आफ्रि का, मंगोलिया या देशांमधील काही कलाकारांचाही सहभाग आहे. यापैकी काही मुस्लीम आफ्रिकन कलाकारांनी इदगाहवर हजेरी लावून पारंपरिक पद्धतीने ईदची नमाज अदा केली. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्थानिक युवकांची गर्दी झाली होती. बहुतांश युवकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन, गळाभेट घेत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. (फोटो-२२पीएचअ‍ेयू६६)
पोलिसांकडून गुलाबपुष्पचे वाटप
इदगाह मैदानावर खतीब हिसामुद्दीन यांच्यासह मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शहराच्या प्रथम नागरिकापासून सर्वच लोकप्रतिनिधींनी इदगाहवर येणे टाळले. (२२पीएचअ‍ेयू६१: शहर-ए-खतीब यांना शुभेछा देताना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील)
 

Web Title: Mass memorandum; Celebrating Bakery Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.