आरोग्य संवर्धनाच्या संदेशासाठी मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:26 AM2017-12-26T00:26:05+5:302017-12-26T00:28:16+5:30

 Marathon for health promotion message | आरोग्य संवर्धनाच्या संदेशासाठी मॅरेथॉन

आरोग्य संवर्धनाच्या संदेशासाठी मॅरेथॉन

Next

देवळाली कॅम्प : ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असा संदेश देत देवळाली कॅम्प येथील दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दाऊदी बोहरा समाजाचे नाशिक प्रांताचे धर्मगुरू शेख मोहम्मद सुनेलवाला यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. येथील दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने धर्मगुरू मौला सय्यदना अली कदर मुक्कादल यांच्या आदेशानुसार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेख मोहम्मद सुनेलवाला म्हणाले, आरोग्यच खरी संपत्ती असून, आपल्या आरोग्याचे संरक्षण करताना प्रामुख्याने प्रत्येकाने नियमित व्यायाम व योग प्राणायाम करणे गरजेचे आहे.  व्यासपीठावर मुल्ला मुफद्दल बख्तर, डॉ. मुस्तफा टोपीवाला, नगरसेवक सचिन ठाकरे, नागेश देवाडिगा, अली अजगर सुबा आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. या मॅरेथॉनमध्ये दाऊदी बोहरा समाजाच्या बांधवांसह देवळालीतील नागरिक, स्पर्धक व अन्नाज टेम्पल हिल ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. येथील कॅन्टोन्मेंट उद्यान येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. नवीन बसस्थानक-डेअरी फार्म- सेंट पेट्रिक्स हायस्कूल-टेम्पल हिल मार्ग व पुन्हा उद्यानाच्या गेटवर मॅरेथॉनचा समारोप झाला. यावेळी डॉ. मुस्तफा टोपीवाला यांनी मधुमेह निवारणासाठी करावे लागणारे उपाय व व्यायाम प्रकार याविषयी माहिती दिली. मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी मुल्ला अजगरभाई इंदोरवाला, महादभाई कॉन्ट्रॅक्टर, अबुझर औरंगाबादवाला, मुर्तुझा पटेल, हातिमभाई नाशिकवाला, युसूफ नाशिकवाला आदींसह दाऊदी बोहरा समाजाचे नागरिक प्रयत्नशील होते. 
पोलीस प्री-मॅरेथॉनला उस्फूर्त प्रतिसाद 
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्यात येणाºया नाशिक मॅरेथॉनकरिता सहभागी होणाºयांसाठी ५ किमी प्री-मॅरेथॉनचे आयोजन येथील खंडेराव टेकडी परिसरात करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी देवळालीतील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब यांसह परिसरातील आठ शाळांनी उतस्फूर्तपणे सहभाग नोंदवीत स्पर्धा यशस्वीतेपणे पार पाडली. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title:  Marathon for health promotion message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक