मान्सूनसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 12:47 AM2021-05-29T00:47:06+5:302021-05-29T00:48:09+5:30

पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून पुलांची पाहणी तसेच डागडुजी हाती घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

Make a disaster management plan for the monsoon | मान्सूनसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा करा

मान्सूनसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा करा

googlenewsNext
ठळक मुद्देराधाकृष्ण गमे : पुलांची पाहणी; डागडुजी करण्याच्या सूचना

नाशिक : पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून पुलांची पाहणी तसेच डागडुजी हाती घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सून पूर्व तयारीचा विभागीय आढावा, विभागीय दक्षता व नियंत्रण, महिला व बालकल्याण विशाखा समितीचा आढावा आणि कोविड व्यवस्थापन तसेच अनुषंगिक विषयांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. मान्सूनच्या काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारणासाठी नियोजन करून सज्ज रहावे. तसेच प्रत्येक विभागाने चोवीस तास नियंत्रण कक्षाची स्थापना करू त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव साहित्य पोच करणे आणि हे साहित्य चालू स्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्पुरत्या निवारा जागांची निश्चिती करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या आहेत.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले, जलसंपदाचे डॉ. संजय बेलसरे, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजेंद्र भोसले, संजय यादव, अभिजित राऊत, राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, राजेंद्र क्षीरसागर, वान्मथी सी, डॉ. बी. एन. पाटील, रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील,  मनोज पाटील, चिन्मय पंडित आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पूरपरिस्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे. तसेच सर्व पुलांचे निरीक्षण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सुस्थितीबाबत खात्री करावी. यासोबतच दरडी कोसळणे, वीज पडणे, झाडे रस्त्यावर पडून वाहतूक बंद होणे यावर संबंधित विभागाने व्यवस्था करावी. पुराचा धोका असणाऱ्या गावांना हवामानासंबंधी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना समाजमाध्यमांद्वारे पोहोचविण्याबाबत प्रयत्न करावेत, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपद्‌ग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी, निवारा, कपडे, इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करून पुरात घरे वाहून गेलेल्या निराश्रितांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. महसूल विभागाने मदत व पुनर्वसन आणि पंचनामे करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Make a disaster management plan for the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.