कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:38 AM2017-07-27T01:38:30+5:302017-07-27T01:38:47+5:30

नाशिक :विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

karajamaukataisaathai-kaisaana-sabhaecae-jaelabharao | कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे जेलभरो

कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे जेलभरो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा दिला होता.
भारतीय कम्युनिष्ट पक्षाने बुधवारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली, त्यापार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कर्जमुक्ती झालीच पाहिजे, समृद्धी महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सातभर चाललेल्या या आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून सातबारा उतारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश्ीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के शेतमालाला भाव द्या, कसत असलेल्या वनजमिनी नावांवर करा, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी येथील वनदावे त्वरीत मंजुर करा, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, राज्य व केंद्र सरकारने हमी भाव देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा किंमत स्थिरता व मदत निधी उभा करावा, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फसवी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. राज्यभर सुकाणू समितीने सरसकट कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाची दखल घ्यावी, पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकरी, उपसा जलसिंचन बंद पडलेल्या आळंदी उपसा जलसिंचन संस्था वाडगाव यांचे कर्ज माफ करा, समृद्धी महामार्गासाठी बागायती व पिकाऊ जमिनी घेऊ नये, शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीजबिल माफ करा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी स्वत:हून स्वत:ला अटक करून घेतली. यावेळी पोलिसांनी ३४३ आंदोलकांना अटक करून दुपारनंतर सोडून दिले. या आंदोलनात कॉ. राजू देसले, कॉ. भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, संजय बैरागी, किरण डावखर, नामदेव बोराडे, राजपाल शिंदे, साधना गायकवाड, सोमनाथ वाघ, रावसाहेब हारक, प्रकाश भालके, रतन गायधनी, ज्योती नटराजन, विमल पोरजे, मधुकर कसबे, दत्तात्रय गांगुर्डे, मीना आढाव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले.
छावणीचे स्वरूप
दोन दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या महापालिकेत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन होत असल्याने पोलिसांनी सकाळी नऊ वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाला सशस्त्र वेढा दिला. कार्यालयाच्या बाहेर तसेच आवारात जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तिन्ही प्रवेशद्वार बंद करून घेऊन विचारपूस करूनच अभ्यागतांना सोडण्यात येत होते. अगदी आंदोलकांना अटक केल्यानंतरही सायंकाळपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.

 

Web Title: karajamaukataisaathai-kaisaana-sabhaecae-jaelabharao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.