शिरखुर्म्याचा सुगंध दरवळला, घरातच झाली नमाज, कोरोना सावटातही ईदचा उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:04 PM2021-05-14T14:04:02+5:302021-05-14T14:38:39+5:30

मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास गुरुवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता.

The fragrance of Shurkurma wafted, Namaz was performed at home | शिरखुर्म्याचा सुगंध दरवळला, घरातच झाली नमाज, कोरोना सावटातही ईदचा उत्साह 

शिरखुर्म्याचा सुगंध दरवळला, घरातच झाली नमाज, कोरोना सावटातही ईदचा उत्साह 

googlenewsNext
ठळक मुद्दे मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास गुरुवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता.

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.14) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे मैदानावर शुकशुकाट पसरलेला पहावयास मिळाला.

मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास गुरुवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेसाठी (ईबादत) देण्याचा प्रयत्न केला जात होता. पाचवेळेचे नमाजपठण, कुराणपठण घरच्याघरी समाजबांधवांकडून नियमितपणे केले जात होते. गुरुवारी चंद्रदर्शन घडले आणि चालू इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन 'शव्वाल' महिन्याला प्रारंभ झाला. या इस्लामी महिन्याच्या 1 तारखेला शुक्रवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली. 

पहाटेपासून मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग दिसून येत होती. नागरिकांनी पहाट उजाडताच दूध खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, देवळाली गाव, विहितगाव आदी भागात मशिदीबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा ईदचे नमाजपठण मशिदींमधूनदेखील होऊ शकले नाही यामुळे समाजबांधवांचा काहीसा हिरमोड झाला. आबालवृद्धांनी घरच्या घरीच फातिहापठण व नमाजपठण केले. बाजारपेठा बंद राहिल्याने बहुतांश नागरिकांनी यंदा ईदची खरेदीदेखील केली नसल्याने जुनेच कपडे स्वच्छ धुवून त्यावर इस्तरी फिरवून परिधान केल्याचे दिसून आले. नागरिकांनी ईदची खरेदी कोरोनाच्या संसर्गामुळे याहीवर्षी पुढे ढकलली. संपूर्ण मुस्लीमबहुल भागात ईद उत्साहात आणि शांततेत पार पडली. ईदगाहवरदेखील कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

'जुमा'चे नमाजपठणही घरी

कोरोनामुळे मशिदींमध्ये सामुदायिक नमाजपठण बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे गेल्या संपूर्ण रमजान पर्वात समाजबांधवांनी 'जुमा' अर्थात शुक्रवारची विशेष नमाज घरीच अदा केली. या शुक्रवारीही हीच स्थिती होती. शहरातील बहुतेक मशिदींच्या द्वारावर 'मस्जिद बंद हैं' असे फलक वाचावयास मिळाले.

शिरखुर्म्याचा दरवळला खमंग सुगंध

रमजान ईदचे 'शिरखुर्मा' हे खाद्यपदार्थ विशेष आकर्षण असते. दूध आणि सुकामेवा एकत्र करुन तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थचा तसेच शेवयांचा सुगंध शुक्रवारी सकाळी मुस्लीबहुल भागात दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात येते.

शुक्रवारी 'ईद'; उत्साह द्विगुणित

यावर्षी शुक्रवारी ईद आल्याने समाजबांधवांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. जणू एकप्रकारे हा दुग्धशर्करा योग ठरला. कारण धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी शुक्रवारला साप्ताहिक ईद चा दिवस असे म्हटले आहे, असे धर्मगुरु सांगतात. दुपारी शुक्रवारचे नमाजपठण देखील समाजबांधवांनी घरातच केले.

सोशल मीडियावर 'ईद मुबारक'चा वर्षाव

गुरुवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्यापासून तर शुक्रवारी दिवसभर सोशलमीडियावर 'ईद मुबारक'च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. एकापेक्षा एक सरस वॉलपेपर्स, चित्रफीतींद्वारे ईद च्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात होती. एकूणच शुभेच्छांच्या संदेशांची गर्दी व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिसून आली.
 

Web Title: The fragrance of Shurkurma wafted, Namaz was performed at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.