नाशिक जिल्ह्यात अवघा पाच टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 03:55 PM2019-06-14T15:55:44+5:302019-06-14T15:56:03+5:30

पाणीसंकट गडद : मान्सूनचे आगमन लांबल्याने बळीराजा चिंतेत

 Five percent water stock in Nashik district | नाशिक जिल्ह्यात अवघा पाच टक्के पाणीसाठा

नाशिक जिल्ह्यात अवघा पाच टक्के पाणीसाठा

Next
ठळक मुद्देपावसाने येत्या दहा-पंधरा दिवसात समाधानकारक हजेरी न लावल्यास पाणीसंकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

नाशिक : मृग नक्षत्र दुसऱ्या चरणाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले तरी जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही, त्यामुळे खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा पाच टक्के पाणीसाठा उरला असून ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाणीसंकट अधिक गडद होत चालले आहे.
जिल्ह्यात दुष्काळाची धग अधिक तिव्र बनत चालली आहे. सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ठिकठिकाणी विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत तर टॅँकरने केला जाणारा पाणीपुरवठाही अपुरा ठरू लागला आहे. पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असतानाच पावसाने मात्र वक्रदृष्टी केली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन सहा दिवस उलटले तरी अद्याप समाधानकारक पावसाची चिन्हे दिसेनात. त्यातच अजून मान्सून येऊन धडकला नसल्याने खरीपाची पेरणीही खोळंबली आहे. जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची सरासरी १५४.९७ मि.मी. इतकी आहे. परंतु दि. १ ते १४ जून या कालावधीत आतापर्यंत केवळ १९.४७ मि.मी. म्हणजे १.९२ टक्के इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे. गुरुवारी (दि.१३) जिल्ह्यातील सुरगाणा, येवला आणि इगतपुरी तालुक्यात थोड्या फार प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. मात्र, अपेक्षित अशी पावसाची हजेरी नसल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठाही वेगाने घटत चालला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत १३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. पावसाने येत्या दहा-पंधरा दिवसात समाधानकारक हजेरी न लावल्यास पाणीसंकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्यापही काही तालुक्यातून टॅँकरची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. पावसामुळे खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.

Web Title:  Five percent water stock in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.