सत्ता गमावल्यानंतर प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 07:26 PM2017-11-02T19:26:09+5:302017-11-02T19:28:57+5:30

मनसे सूत्रांची माहिती : संघटनात्मक फेरबदल शक्य

 For the first time after losing power Raj Thackeray visits Nashik | सत्ता गमावल्यानंतर प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

सत्ता गमावल्यानंतर प्रथमच राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Next
ठळक मुद्देयेत्या १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी नाशिकला गेल्या आठ महिन्यांत पाऊल ठेवले नाही

नाशिक : महापालिका निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच मनसेचे प्रमुख राज ठाकरे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याबरोबरच संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, राज यांच्या उपस्थितीत पक्ष सोडून गेलेल्या काही माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्याची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांची १७ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा झाली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीत मनसेला सपाटून मार बसल्याने पक्षाचे अवघे पाच नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी नाशिकला गेल्या आठ महिन्यांत पाऊल ठेवले नव्हते. मध्यंतरी दोन-तीन वेळा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगितले जायचे परंतु, राज यांच्या दौऱ्याला काही केल्या मुहूर्त लागत नव्हता. महापालिका निवडणुकीनंतर राज यांनी मुंबईतील सभेत बोलताना ‘आता पुन्हा पराभव पाहायचा नाही’ असे सांगत हताश झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, नंतरच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेला अपयशच पहावे लागले होते. सततच्या पराभवाने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य येण्यासाठी गेल्या महिन्यात राज यांनी मुंबईत काढलेला मोर्चा पूरक ठरला. त्यानंतर रेल्वेस्थानकाजवळील फेरीवाल्यांचाही प्रश्न उपस्थित करत मनसेने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दर्शविण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यात राज यांनी कल्याण-डोंबिवली याठिकाणी दौरे करून स्थानिक प्रश्नांनाही हात घालण्यास सुरुवात केली आहे. आता आपला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या  नाशिककडे राज यांनी लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, येत्या १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्यात राज हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, संघटनस्तरावर फेरबदलाचेही संकेत मिळत आहेत.
पक्ष सोडून गेलेल्यांना ‘नो एण्ट्री’
मनसेची सध्याची स्थिती पाहता पक्ष बळकटीकरणासाठी यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा परत घेण्याची मागणी पक्षपातळीवर होऊ लागली असताना राज यांनी मात्र, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश देण्यास साफ नकार दिल्याचे समजते. त्यामुळे, मनसेत येऊ इच्छिणाऱ्याच्या घरवापसीला ब्रेक लागणार आहे. दरम्यान, काही माजी नगरसेवक पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे पक्षातीलच काही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title:  For the first time after losing power Raj Thackeray visits Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.