बंद उद्योगांकडे चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:02 PM2019-03-19T23:02:20+5:302019-03-20T01:08:16+5:30

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

Closed companies have four crore rupees | बंद उद्योगांकडे चार कोटी

थकबाकीदारांच्या घरावर जप्ती वॉरंट चिकटविताना महानगरपालिकेचे कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देथकबाकी वसुलीचे आव्हान : महापालिकेने आतापर्यंत केले १७ कोटी वसूल

गोकुळ सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. सातपूर विभागातून घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करांची आतापर्यंत ४५ टक्के म्हणजेच जवळपास १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली असली तरी उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न विभागीय कार्यालयाकडून केला जात आहे. मात्र ३० ते ३५ बंद कारखान्यांकडे असलेली जवळपास ४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांकडून महापालिकेची थकबाकी नियमित वसूल होत असते. मात्र बड्या लोकांकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने अशी थकबाकी वसुली करणे महत्त्वाचे असते. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी ठोस उपाययोजना आखून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. गायकवाड यांनी सर्व प्रथम प्रत्येक मिळकतधारकास देयके वेळेवर देण्याचा प्रयत्न केला आहे. वॉरंट, सूचना पत्र पाठविले. ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
निरीक्षक आणि लिपिक यांना दररोजचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र काही बडे थकबाकीदार दाद देत नव्हते म्हणून मिळकतींच्या दारावर थकबाकीची यादी चिकटवण्यात येत आहे. १४ हजार मिळकत धारकांना सूचना पत्र देण्यात आलेले आहेत. ४२ थकबाकीदारांकडे जवळपास २३ लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांच्यावर जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. १२ हजार नळपट्टीधारकांना सूचना पत्र देण्यात आले असून, २५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. ७५ गाळेधारक थकबाकीदार असून थकबाकी भरली नाही तर गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर थेटे, बबन घाटोळ, रामचंद्र सूर्यवंशी, विष्णू पगार, दादा बंदावणे, पोपट बंदावणे, मनोहर बेंडकुळे, संजय निगळ, प्रभाकर बंदावने आदींसह कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत.
सतरा कोटींची वसुली
यावर्षी घरपट्टी पोटी ११ कोटी ६२ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यात मागील वषार्ची मोठी थकबाकी असल्याने ४५ टक्के वसुली झाली आहे, तर यावर्षीची ७२ टक्के वसुली झाली आहे. २६ कोटी ५२ लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. पाणीपट्टी पोटी यावर्षी चार कोटी ११ लाख रुपयांची वसुली झाली आहे. १४ कोटी १७ लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. विविधकरांची वसुली एक कोटी २२ लाख रुपये झाली आहे, तर २ कोटी ७० लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. एकूण सुमारे १७ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळाले आहे. विविध कारणांनी बंद असलेल्या ३० ते ३५ कारखान्यांकडे तब्बल चार कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. दरवर्षी या थकबाकीत वाढ होत आहे.

Web Title: Closed companies have four crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.