अवयवदानातील गैरप्रकार रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:42 AM2017-10-07T01:42:32+5:302017-10-07T01:42:32+5:30

अवयवदानासाठी अपघातग्रस्त महिलेला ब्रेनडेड घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील दोन बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

Challenge of Prevention of Unlawful Organism | अवयवदानातील गैरप्रकार रोखण्याचे आव्हान

अवयवदानातील गैरप्रकार रोखण्याचे आव्हान

Next

नाशिक : अवयवदानासाठी अपघातग्रस्त महिलेला ब्रेनडेड घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील दोन बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकारामुळे अवयवदानाच्या नावाखाली मोठे रॅकेटच कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली असून, अवयवदानातील गैरप्रकार रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
मयत महिलेचे पती अश्विन जामदार यांनी महापालिकेकडे याबाबत तक्रार केल्यानंतर अवयवदानातील सदर प्रकार समोर आला. या साºया प्रकाराबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले, दि. २४ आॅगस्ट रोजी जया जामदार या महिलेचा कॉलेजरोडवर अपघात झाला होता. सदर महिलेच्या मेंदूला मार लागल्याने तिला जवळच्याच विजन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचारानंतर सदर महिलेची प्रकृती खालावली. यावेळी रुग्णालयातील डॉ. संजीव देसाई यांनी सदर महिलेला बे्रनडेड घोषित केले. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांचे अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आल्याची माहिती आहे.
एका डॉक्टरला अशा प्रकारे रुग्णाला ब्रेनडेड घोषित करता येत नाही. त्यासाठी कमिटी असते. नाशिक शहरात ऋषिकेश हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल, अपोलो आणि वोक्हार्ट या चारच रुग्णालयांना अवयवदानासाठी परवानगी आहे. त्यानुसार विजन हॉस्पिटलमधून सदर महिलेला साईबाबा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, याठिकाणी कमिटीने महिला ब्रेनडेड नसल्याचे स्पष्ट केले. अवयवदान करायचे असेल तर सदर रुग्णालयाकडून उपचाराचा खर्च नातेवाइकांकडून घेतला जात नाही. महिला ब्रेनडेड नसल्याने साईबाबा हॉस्पिटलने महिलेच्या नातेवाइकांकडून उपचाराच्या खर्चाची मागणी केली आणि राजीव गांधी जीवनदायी योजनेचा फॉर्मही भरून घेतला.
त्यानंतर ऋषिकेश हॉस्पिटलची कमिटी बोलावून महिलेला ऋषिकेशमध्ये हलविण्यात आले. दि. २९ आॅगस्ट रोजी सदर महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यावेळी मुंबईतून झोनल कमिटीनेही येत माहिती घेतली. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने एक पथक तयार करत संबंधित रुग्णालयांच्या डॉक्टरांसह कर्मचाºयांचे जबाब घेतले. मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने विजन आणि साईबाबा हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून आलेला खुलासा शासनाच्या झोनल कमिटीकडे पाठविला जाणार असल्याचेही डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले. या प्रकाराने मात्र अवयवदानाच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, त्यात मोठे रॅकेटच कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांत अवयवदानासंबंधी मोठ्या प्रमाणावर जागृती केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक मयत रुग्णांच्या नातेवाइकांकडून मृत व्यक्तींच्या अवयवांचे दान करण्यास संमती दिली जात आहे. नाशिकमध्ये गेल्या वर्षभरात अवयवदानाच्या काही घटना घडल्या आहेत. अवयवदानाच्या या संकल्पनेचे सर्वत्र स्वागतही केले जात आहे. पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरीडोर उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, अवयवदानाच्या नावाखाली गैरप्रकार होत असेल तर पोलीस यंत्रणेसह जिल्हा प्रशासनापुढे सदर रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: Challenge of Prevention of Unlawful Organism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.