डॉक्टरांवरील हल्ले हे समाजाचे दुर्दैव अन् सरकारचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 07:08 PM2019-06-15T19:08:03+5:302019-06-15T19:12:53+5:30

डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.

The attacks on doctors are bad luck of the society and the failure of the government | डॉक्टरांवरील हल्ले हे समाजाचे दुर्दैव अन् सरकारचे अपयश

डॉक्टरांवरील हल्ले हे समाजाचे दुर्दैव अन् सरकारचे अपयश

Next
ठळक मुद्देसरकारने कठोर कायदा करावा.सोमवारपासून इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देशव्यापी संप

कोलकाता येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात डॉक्टरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांच्याशी साधलेला संवाद ...

कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याबाबत थोडक्यात सांगा?
कोलकाता येथे डॉक्टरवर एक वृध्द रूग्ण दगावल्यामुळे काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. हा हल्ला केवळ एका डॉक्टरवर नसून संपुर्ण वैद्यकिय पेशावर हल्ला आहे. या हल्ल्याचा आयएमए संघटनेने राष्ट्रीय स्तरावर निषेध नोंदविला आहे. उपचारादरम्यान रूग्ण दगावला तर त्यास डॉक्टरला जबाबदार धरणे हा गैरसमज समाजाने दूर करावा. कुठलाही डॉक्टर रूग्णाचा जीव धोक्यात घालण्यासाठी उपचार करत नाही.

संपामुळे डॉक्टरांवरील हल्ले थांबवू शकतात का?
डॉक्टरांवर संपाची वेळ वारंवार येणे हे समाजासाठी आणि वैद्यकिय पेशाकरिताही मोठी दुर्दैवी बाब आहे. समाजाच्या भल्यासाठी डॉक्टर कार्यरत असतात; मात्र त्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात नसेल तर डॉक्टरांकडे लोकशाही मार्गाने संप पुकारण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. संपाची वेळ सरकारने येऊ देऊ नये. त्यासाठी सरकारने डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करायला हवे.

डॉक्टर-रूग्ण या नात्यात वितुष्ट आले आहे असे वाटते का?
डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. जीवन-मृत्यू हे डॉक्टरांच्या हातात नाही, हे लक्षात घ्यावे. डॉक्टर केवळ मृत्यूच्या दारातून वाचविण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावून प्रयत्न करू शकतो, हे समाजाने समजून घेणे काळाची गरज आहे.

देशव्यापी संपाबाबत थोडक्यात सांगा ?
सोमवारपासून (दि.17) इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व खासगी डॉक्टर काळ्याफिती लावून अपात्कालीन स्थितीत अत्यावश्यक सेवा देतील; मात्र बाह्यरूग्ण तपासणी (ओपीडी) पुर्णपणे बंद राहणार आहे. रूग्णांनी याबाबत नोंद घ्यावी. शहरासह जिल्ह्यातील हजारो डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार आहे. संघटनेच्या वतीने हा राष्ट्रीय स्तरावर संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपाचा केवळ एकच उद्देश आहे तो म्हणजे, सरकारने डॉक्टरांवरील भ्याड हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करावा.

शब्दांकन : अझहर शेख

Web Title: The attacks on doctors are bad luck of the society and the failure of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.