करबुडव्यांविरुद्ध कारवाई

By Admin | Published: March 28, 2017 02:03 AM2017-03-28T02:03:21+5:302017-03-28T02:03:32+5:30

मालेगाव : महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या २० हजार लहान-मोठ्या करबुडव्या मालमत्ताधारकांविरुद्ध मनपा प्रशासनाने जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे,

Action against taxpayers | करबुडव्यांविरुद्ध कारवाई

करबुडव्यांविरुद्ध कारवाई

googlenewsNext

अतुल शेवाळे : मालेगाव
महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या २० हजार लहान-मोठ्या करबुडव्या मालमत्ताधारकांविरुद्ध मनपा प्रशासनाने जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, तर २३ थकबाकीदार नळधारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभागनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात अडकल्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे काम मंदावले आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील कलेक्टरपट्टा, द्याने, सोयगाव, म्हाळदे, भायगाव, सायने गावांमध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाच्या संकीर्ण कर विभागाने कंबर कसली आहे. मालेगाव महापालिकेला शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त मालमत्ता करातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. नागरी सुविधा पुरविण्यासाठी व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मालमत्ता कर वसुलीतून येणारा पैसा खर्च केला जातो. मालेगाव शहरात हद्दवाढीसह एक लाख दहा हजार मालमत्ताधारक आहेत. यात ८० हजार घरगुती मालमत्ताधारक तर उर्वरित ३० हजारमध्ये वाणिज्य व औद्योगिक मालमत्ताधारकांचा समावेश आहे. मनपाच्या संकीर्ण कर विभागाने  १ एप्रिल २०१६ ते २४ मार्च २०१७ पर्यंत घरपट्टीपोटी दहा कोटी ४३ लाख ६८ हजार ९०१ रुपये, तर पाणीपट्टीपोटी सात कोटी ७२ लाख ७८ हजार रुपये असे एकूण १८ कोटी १६ लाख ४७ हजार ७६६ रुपये वसूल झाले आहेत. मनपा प्रशासनाने ४८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात पाणीपट्टीचे २६ कोटी, तर घरपट्टीचे २२ कोटी रुपये ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात मालमत्ता कर वसुलीची कारवाई सातत्य नसल्यामुळे वसुली कमी झाली. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या संकीर्ण कर विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कंबर कसली आहे. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या व इतर कामे मनपात सुरू आहेत. यामुळे वसुलीचे काम रखडले आहे. तरीदेखील शहरातील २० हजार लहान-मोठ्या मालमत्ताधारकांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदारांमध्ये झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.
पाणीपट्टी वसूल होत नसल्यामुळे मनपाने २३ नळधारकांचे नळजोडण्या खंडित केल्या आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभागनिहाय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. एका प्रभागात दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. एका पथकात एक
जप्ती अधिकारी, दोन वॉर्ड  लिपिक, तीन शिपाई अशा सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

Web Title: Action against taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.