दक्षिण नांदेडाला २५ मेपर्यंतचाच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:41 AM2019-05-16T00:41:33+5:302019-05-16T00:46:02+5:30

विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयशच येत असून वारंवार पथके स्थापन करुनही प्रत्यक्षात पाणी उपसा सुरुच आहे. त्यात महावितरणचे अवैध पाणी उपशाला अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सहकार्याचा फटका दक्षिण नांदेडला बसणार आहे. विष्णूपुरीत केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे.

 South reservoir reservoir till May 25 in Nandeda | दक्षिण नांदेडाला २५ मेपर्यंतचाच जलसाठा शिल्लक

दक्षिण नांदेडाला २५ मेपर्यंतचाच जलसाठा शिल्लक

Next
ठळक मुद्देपथके नावालाच, पाण्याचा उपसा सुरुचमृतसाठा उपलब्ध होण्याबाबतही साशंकता

नांदेड : विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यात अपयशच येत असून वारंवार पथके स्थापन करुनही प्रत्यक्षात पाणी उपसा सुरुच आहे. त्यात महावितरणचे अवैध पाणी उपशाला अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या सहकार्याचा फटका दक्षिण नांदेडला बसणार आहे. विष्णूपुरीत केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे.
नांदेड शहराला पाणीपुरवठा होणा-या विष्णूपुरी प्रकल्पातील अवैध पाणीउपसा रोखण्याचा विषय आॅक्टोबरपासून चर्चेत आहे. उपाययोजनाही केल्या जात आहेत. पण त्या उपाययोजना यशस्वी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गांधी जयंती दिनी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला १६ डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ पर्यत प्रकल्प परिसरातील बागायतदारांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी २५ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीनंतर झाली. पण त्यातही शेतकºयांनी वेगवेगळ्या क्लुप्त्याद्वारे वीजपुरवठा घेत पाणी उपसा सुरुच ठेवला आहे. केवळ तीन टक्के पाणी उरल्यानंतर प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे.
जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार, कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, पोफळे आदी अधिकारी मंगळवारी विष्णूपुरी प्रकल्प परिसरात पोहोचले. यावेळी दोनशे ते अडीचशे पंपाद्वारे पाणीउपसा सुरु असल्याचे वास्तव चित्र दिसले. पोलिसांच्या मदतीने या पथकाने विद्युतपंपाचे वायर जप्त करण्याची कारवाई केली. यावेळी गावकºयांनी विरोधही केला. यावेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने गावक-यांच्या रोषाला अधिका-यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता पोलीस बंदोबस्तातच कारवाई केली जाणार आहे.
प्रत्यक्षात विष्णूपुरी प्रकल्पातून प्रतिदिन ०.२६ दलघमी पाणी कमी होत आहे. महापालिका केवळ ०.१३ दलघमी पाणी घेत आहे. ०.८ दलघमी पाणी एमआयडीसी, ०.३ दलघमी पाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी घेतले जात आहे. उर्वरित ०.१३ दलघमी पाणी कुठे जात आहे, याचा उलगडा मंगळवारी अधिकाºयांना झाला. त्यानंतर आता पुन्हा आहे ते पाणी कसे जतन करायचे यावर मंथन केले जात आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे दक्षिण नांदेडचा पाणीप्रश्न आता ऐरणीवर आला आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. मृतसाठ्यातून पाणी उपलब्ध न झाल्यास कोणताही पर्याय नाही. त्यामुळे दक्षिण नांदेडकरांना मात्र आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
दरम्यान, शहरातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे़ दोन दिवसापूर्वी तरोडा खू़ भागातील सिद्धांतनगरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता़ त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता़
प्रकल्पात गाळ किती यावरच पुढील निर्णय
विष्णूपुरीतील जीवंत जलसाठा संपल्यानंतर मृत जलसाठा उचलण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. कोटीतीर्थ आणि काळेश्वर येथील विहिरीमध्ये दहा पंपाने पाणी घेतले जाणार आहे. त्यातून जवळपास १५ दिवस पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
मृतसाठ्यातून पाणी घेण्याची तयारी केली जात असताना प्रत्यक्षात मृत जलसाठा किती उपलब्ध होईल, याबाबत आता साशंकता आहे. दोन ते अडीच दलघमी पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात प्रकल्पात गाळ किती आहे, यावरच सर्व काही अवलंबून आहे.
आता बैठ्या पथकाद्वारे पाण्याची राखण
ही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आता विष्णूपुरी प्रकल्प परिसरात दोन्ही बाजुंच्या आठ गावांमध्ये आता बैठे पथक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. हे पथक केवळ पाणी कुठे उपसले जात आहे याची माहिती अधिका-यांना देणार आहे.
पाणी उपसणा-याविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकांच्या स्थापनेची प्रक्रिया महापालिका प्रशासन करीत आहे. या पथकात तीन पोलीस कर्मचारी, ५ मजूर, एक वाहन टेम्पो, वीज वितरण कंपनीचा एक कर्मचारी समाविष्ठ राहणार आहे. या पथकाद्वारे पाणी उपसा थांबेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title:  South reservoir reservoir till May 25 in Nandeda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.