चुकीच्या संदेशामुळे रेल्वे स्थानकावर सहकारमंत्र्यांच्या प्रतीक्षेत अधिकारी ताटकळले   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 08:08 PM2018-10-11T20:08:25+5:302018-10-11T20:17:21+5:30

सहकारमंत्री  सुभाष देशमुख नांदेडला येणार असल्याने रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा ताफा हारतुरे घेऊन उपस्थित होता.

Officers are in waiting for the minister at the railway station due to wrong message | चुकीच्या संदेशामुळे रेल्वे स्थानकावर सहकारमंत्र्यांच्या प्रतीक्षेत अधिकारी ताटकळले   

चुकीच्या संदेशामुळे रेल्वे स्थानकावर सहकारमंत्र्यांच्या प्रतीक्षेत अधिकारी ताटकळले   

Next
ठळक मुद्देसकाळी पाऊणेनऊच्या सुमारास मुंबई-सिकंदराबाद ही देवगिरी एक्स्प्रेस नांदेड रेल्वेस्थानकात आली. गाडीमध्ये मंत्रीमहोदय नसल्याने उपस्थितांत एकच गोंधळ उडाला. 

- विशाल सोनटक्के

नांदेड : सहकारमंत्री  सुभाष देशमुखनांदेडला येणार असल्याने रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा ताफा हारतुरे घेऊन उपस्थित होता. भाजपा पदाधिकारीही नेत्याच्या स्वागतासाठी स्थानकावर आवर्जुन आले होते. सकाळी पाऊणेनऊच्या सुमारास मुंबई-सिकंदराबाद ही देवगिरी एक्स्प्रेस नांदेड रेल्वेस्थानकात आली. यावेळी अधिकाऱ्यांसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या डब्याकडे धाव घेतली. मात्र गाडीमध्ये मंत्रीमहोदय नसल्याने उपस्थितांत एकच गोंधळ उडाला. 

त्यानंतर फोनाफोनी झाल्यानंतर सुभाष देशमुख हे पूर्णा येथे उतरुन मोटारगाडीने येत असल्याचे समजल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा श्वास घेतला. हा सारा प्रकार एका अधिकाऱ्याने चुकीची माहिती दिल्याने झाला. या अधिकाऱ्याला नंतर शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.

नांदेड येथे जनसहभागातून निर्मिती झालेल्या श्री गुरुजी रुग्णालय या सहकार तत्वावरील मराठवाड्यातील पहिल्या अद्ययावत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११ वाजता पूर्णा रोडवरील एका फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुभाष देशमुख हे बुधवारी रात्री मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडकडे निघाले. 

ही गाडी सकाळी पावणेनऊ-नऊच्या सुमारास नांदेड स्थानकात पोहोचते. मात्र सध्या नांदेड-मुदखेड या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरु असल्याने या मार्गावर रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे  नांदेडकडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे सहकार विभागातील एका बड्या अधिकाऱ्याने सुभाष देशमुख यांना दूरध्वनी करुन ‘तुम्ही पूर्णा रेल्वे स्थानकावर उतरा. पुढे गाडी जात नसल्याने तेथून आपण मोटारीने नांदेडकडे येऊ’ असा संदेश दिला आणि त्यानुसार हा अधिकारी मंत्रीमहोदयांना घेण्यासाठी पूर्णा रेल्वेस्थानकावर पोहोचला. 

सकाळी ८ च्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेस पूर्णा स्थानकात दाखल झाली. सुभाष देशमुख यांच्यासह त्यांचे खाजगी सचिव संतोष पाटील, विद्याधर महाले हे सदर अधिकाऱ्याच्या संदेशानुसार पूर्णा स्थानकात उतरले आणि तेथून मोटारकारने नांदेडकडे निघाले. दरम्यानच्या काळात पूर्णा स्थानकावर अवघे दहा मिनिटे थांबून देवगिरी एक्स्प्रेस नांदेडकडे रवाना झाली. 

याच गाडीची वाट पाहत नांदेड रेल्वे स्थानकावर  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, तहसीलदार किरण आंबेकर यांच्यासह भाजपाचे नांदेड महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे व भाजपाचे अन्य पदाधिकारी हारतुरे घेऊन मंत्रीमहोदयांच्या स्वागतासाठी थांबले होते. पावणेनऊच्या सुमारास ही गाडी रेल्वेस्थानकात आल्यानंतर उपस्थितांनी सुभाष देशमुख यांच्या डब्याकडे धाव घेतली. मात्र गाडीत  देशमुख नव्हते. त्यानंतर फोनाफोनी झाल्यानंतर सहकार विभागाचा एक बडा अधिकारी देशमुख यांना मोटारकारने घेऊन पूर्णेहून नांदेडकडे निघाल्याचे समजले. 

त्यानंतर रेल्वे पाठोपाठ सहकारमंत्री सुभाष देशमुख मोटारकारने नांदेडमध्ये दाखल झाले.  ते शहरातील शासकीय विश्रामगृहावर पोहोचल्याचे समजल्यानंतर अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर एका अधिकाऱ्याच्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व गोंधळ झाल्याचे पुढे आले. या अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे चांगलेच संतापले होते. मात्र  शेवटी सुभाष देशमुख यांनीच जिल्हाधिकाऱ्यांचीही समजूत घालून या प्रकरणावर पडदा टाकला.

पूर्णा सोडताच गाडी झाली पंक्चर
मुंबईहून देवगिरी एक्स्प्रेसने निघालेले सहकारमंत्री सुभाष देशमुख चुकीची माहिती मिळाल्याने नांदेड ऐवजी पूर्णा रेल्वे स्थानकावरच उतरले. तेथून ते संबंधित अधिकाऱ्यांसोबत मोटारकारने नांदेडकडे निघाले. मात्र  पूर्णा सोडल्यानंतर काही अंतरावरच सुभाष देशमुख यांना आणण्यासाठी गेलेली कारही पंक्चर झाली. ही कार दुरुस्त होईपर्यंत देशमुख हे सहकाऱ्यांसह गाडीतच बसून होते. दरम्यान, या संबंधी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. 

Web Title: Officers are in waiting for the minister at the railway station due to wrong message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.