नांदेड लोकसभा : पहिल्या दिवशी एकच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:43 AM2019-03-20T00:43:25+5:302019-03-20T00:43:57+5:30

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नांदेड मतदारसंघात एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्याचवेळी ५१ इच्छुकांनी ९३ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.

Nanded Lok Sabha: Single application on first day | नांदेड लोकसभा : पहिल्या दिवशी एकच अर्ज

नांदेड लोकसभा : पहिल्या दिवशी एकच अर्ज

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : ५१ इच्छुकांनी नेले ९३ उमेदवारी अर्ज

नांदेड : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नांदेड मतदारसंघात एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्याचवेळी ५१ इच्छुकांनी ९३ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी १९ मार्चपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे पहिल्या दिवशी पठाण जफर अलीखान महेमुद अलीखान यांनी अर्ज दाखल केला आहे. ९३ अर्ज निवडणूक विभागातून ५१ इच्छुकांनी नेले आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांची गैरसोय तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या दृष्टीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिकेपर्यंतचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत हा रस्ता २६ मार्च पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी मात्र तो सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत श्याम टॉकीज ते चिखलवाडीकडे जाणाºया वाहनांना शिवाजी महाराज पुतळ्यासमोरुन पोस्ट आॅफिस, न्यायालयाच्या मागील रस्त्याने चिखलवाडीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
दरम्यान, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक तयारी संदर्भातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देवून नांदेड-उत्तर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ७ हजार मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड उत्तर मतदारसंघात ३१ झोन स्थापन करण्यात आले असून ९ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत. नांदेड उत्तर विभागात ३३६ मतदान केंद्र आहेत. १४०० पेक्षा अधिक मतदारसंख्या असल्याने १० सहायक मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांना विविध परवानग्यांसाठी एक खिडकीही सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पंचायत समिती, महापालिका तसेच नायब तहसीलदार हे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात जवळपास अडीच हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना २६ मार्च रोजी पहिले प्रशिक्षण आणि ८ एप्रिल रोजी दुसरे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी यावर्षीही सुलभ निवडणूक राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांची उपस्थिती होती.

Web Title: Nanded Lok Sabha: Single application on first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.