'माय एक नाव राहस,गजबजलेले गाव राहस'; बोली भाषांचे बोट धरून माय मराठीला समृद्ध करणारा धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 08:20 PM2019-03-11T20:20:31+5:302019-03-11T20:24:33+5:30

शिवाजी अंबुलगेकर या ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने बोली भाषांचे बोट धरून मराठीला वंचितांपर्यंत पोहोेचलंय.  

'Mother is name with many surroundings '; a teacher enriching Marathi with the help of mother tongue | 'माय एक नाव राहस,गजबजलेले गाव राहस'; बोली भाषांचे बोट धरून माय मराठीला समृद्ध करणारा धनी

'माय एक नाव राहस,गजबजलेले गाव राहस'; बोली भाषांचे बोट धरून माय मराठीला समृद्ध करणारा धनी

Next

- शिवराज बिचेवार 

नांदेड : माय मराठी जगली पाहिजे आणि विस्तारलीही पाहिजे, हे आता बोलून गुळगुळीत झालं आहे. पण, कमळेवाडीतील भटक्या-विमुक्तांच्या आयुष्यात ज्ञानप्रकाश पोहोचविणाऱ्या शाळेत माय मराठीला समृद्ध करणारा धनी राबतोय. शिवाजी अंबुलगेकर या ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने बोली भाषांचे बोट धरून मराठीला वंचितांपर्यंत पोहोेचलंय.  

मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे भटक्या-विमुक्त समाजातील ८० विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा उभी आहे. ५ वी १२ वीपर्यंत निवासी शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी आहे़ या शाळेत उपलब्ध बोलीभाषेतील शब्दांच्या आधारे कवितांचे भाषांतर करण्यात येते़ या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेसोबतच मराठीचीही गोडी वाटू लागली़ शब्दसंग्रहातही वाढ झाली़ ७ वीच्या पुस्तकातील शशिकांत शिंदे यांच्या ‘माणूसपण गोठलंय’ या कवितेचा गोरमाटी अनुवाद बंडू जाधव या विद्यार्थ्याने केला़ 

आंगाड्या कसो पाळीरो काळ
चार मिना रेतो तो
हारोगार रानू देकन 
मणक्या खुशीमं हासतो तो 

 

अशाप्रकारे ५ वी ते १२ वी पर्यंतच्या अनेक कवितांची गोरमाटी, अहिराणी, वडार, कानडी, हिंदी, पारधी भाषेत विद्यार्थ्यांनी भाषांतरे केली़ फ.मुं. शिंदे यांची आई ही कविता विवेक पाटील या विद्यार्थ्याने अहिराणी भाषेत अनुवादित केली़

माय एक नाव राहस
घरमा नि घरमा 
गजबजलेले गाव राहस
बठासमा राहस तबय जानवस नयी
आते नयी कोठेच तरी बी 
नही म्हणवस नयी़

लोकसाहित्याचे संकलन 
शब्दाप्रमाणे बोलीभाषेतील लोकसाहित्य अडगळीला पडले आहे़ उन्हाळ्याच्या सुट्टीत जाताना लोकगीते, लोक म्हणी, वाक्यप्रचार यांचे संकलन करण्याचा प्रकल्प विद्यार्थ्यांना दिला जातो़ तसेच ज्यांच्याकडून हे संकलित करावयाचे आहे़ अशा व्यक्तीकडून ते जसे उच्चारले तसेच लिहून घेतले जावे़ म्हणजे त्या बोलीचा हेल आणि लहेजा कायम राहील याची दक्षता घेतली़ या प्रकल्पांतर्गत अनेक गाणी आणि इतर साहित्य विद्यार्थ्यांनी संकलित केले़ 

अंबुलगेकर भरवितात विविध प्रयोगांची ‘शाळा’
या ठिकाणी गोरमाटी, कैकाडी, वडार, वासुदेव, पारधी, मसनजोगी यासारख्या जातीतील विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगवेगळी आहे़ त्यामुळे मराठी प्रमाण भाषेतील शिक्षण त्यांच्या आकलन कक्षेत येत नाही़ ही बाब शिक्षक शिवाजी अंबुलगेकर यांनी हेरली़ त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यास त्यांनी सुरुवात केली़ त्यातूनच मराठी कविता बोलीभाषेत अनुवादित करण्याची कल्पना त्यांना सुचली़ मराठी कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ लिहून देताना त्या शब्दांना बोलीभाषेतील पर्यायी शब्द शोधून दिले. 

बोलींचे शब्दकोश
शाळेतील गोरमाटी, वडारी, अहिराणी, पारधी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले़ त्यांना प्रकल्प देण्यात आले़ स्वयंपाकघरातील वस्तू, शेती कामातील वस्तू, वार-महिन्यांची नावे, उद्योग अशाप्रकारचे त्यांच्या बोलीभाषेतील शब्द, त्यांचे पर्याय संग्रह करण्यास विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला़ त्यातून बोलीभाषेतील शब्दकोशाची संकल्पना आकाराला आली़ जाती-जमातींच्या बोली लिखित स्वरुपात कधीच आल्या नाहीत़ त्या केवळ मौखिक होत्या़ परंतु विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बोलीभाषेचा शब्दसंग्रह तयार झाला आहे.

Web Title: 'Mother is name with many surroundings '; a teacher enriching Marathi with the help of mother tongue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.