अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:49 PM2024-05-14T16:49:42+5:302024-05-14T16:51:12+5:30

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील लढत ही काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यातही रायबरेलीमधून यावेळी राहुल गांधी हे निवडणूक लढवत असल्याने या जागेचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील समिकरणं पाहता येथे विजयासाठी काँग्रेसला समाजवादी पक्षाच्या मदतीवर अवलंबून राहणार आहे.

Lok Sabha Election 2024: Akhilesh Yadav's clear orders to the workers to support the SP cycle in the hands of the Congress in Amethi, Rae Bareli | अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 

अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 

उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील लढत ही काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यातही रायबरेलीमधून यावेळी राहुल गांधी हे निवडणूक लढवत असल्याने या जागेचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील समिकरणं पाहता येथे विजयासाठी काँग्रेसला समाजवादी पक्षाच्या मदतीवर अवलंबून राहणार आहे. त्यात उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि सपा हे एकत्र आलेले असल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशमधील ज्या १७ जागांवर मित्रपक्ष निवडणूक लढवत आहे, तिथे आपलाच पक्ष मैदानात असल्यासारखं समजून काम करा, अशा सूचना अखिलेश यादव यांनी दिल्या आहेत. दरम्यान, अमेठी आणि रायबरेलीमधील सभांमध्ये लाल टोपी घातलेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या उपस्थितीमुळे अखिलेश यादव यांच्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे.  

यापूर्वी २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली होती. मात्र त्यावेळी या आघाडीचा दारुण पराभव झाला होता. मात्र अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना तर अमेठी येथून के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रचार अभियानाचं नेतृत्व आपल्याकडे ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी दोन्ही पक्षांमधील आघाडी ही केवळ कागदावरच राहणे कारणीभूत ठरले होते, असा दावा काही नेत्यांनी केला होता. मात्र सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी मात्र वेगळं मत मांडलं जात आहे. सपाचे रायबरेलीमधील जिल्हाप्रमुख वीरेंद्र यादव यांनी सांगितले की, २०१७ मध्ये ऐनवेळी आघाडी झाली होती. त्यामुळे आम्हाला पुरेशी तयारी करता आली नव्हती. मात्र यावेळी इंडिया आघाडी ही सातत्याने बैठका घेत होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेत्यांमधील समन्वय वाढला आहे.

अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येती पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात रायबरेली लोकसभा मतदारसंघामध्ये बछरावां, हरचंदपूर, रायबरेली, उंचाहार आणि सरेनी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर अमेठी लोकभा मतदारसंघामध्ये तिलोई, सलोन, जगदीशपूर, गौरीगंज आणि अमेठी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या दहा विधानसभा मतदारसंघांपैकी रायबरेलीमधील ४ आणि अमेठीमधील दोन मतदारसंघ हे समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहेत. तर रायबेलीमधील एक आणि अमेठीमधील तीन मतदारसंघ हे भाजपाच्या ताब्यात आहेत. मात्र येथील समाजवादी पक्षाच्या सहा आमदारांपैकी दोन आमदारांनी हल्लीच भाजपाला पाठिंबा दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. 

Web Title: Lok Sabha Election 2024: Akhilesh Yadav's clear orders to the workers to support the SP cycle in the hands of the Congress in Amethi, Rae Bareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.