टेळकीत दूधक्रांती गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:04 PM2018-10-16T12:04:35+5:302018-10-16T12:05:22+5:30

यशकथा : कंधार तालुक्यात प्रतिदिन दोन ते अडीच हजार लिटर दूधसंकलन होत असते. एवढे दूध संकलन लोहा तालुक्यातील टेळकी या एकाच गावात होत आहे.

Milk revolution in Telaki | टेळकीत दूधक्रांती गतिमान

टेळकीत दूधक्रांती गतिमान

Next

- डॉ. गंगाधर तोगरे (कंधार, जि.नांदेड)

कंधार तालुक्यात प्रतिदिन दोन ते अडीच हजार लिटर दूधसंकलन होत असते. एवढे दूध संकलन लोहा तालुक्यातील टेळकी या एकाच गावात होत आहे. मुरा, गावरान, जर्सी, जाफरानी आदी म्हैस, गायींचे संगोपन करीत येथील पशुपालकांनी दूग्धक्रांतीतून आर्थिक आधार मिळवण्यासाठी धडपड चालवली आहे. 

मन्याड खोऱ्यातील शेतकरी निसर्ग, पावसावर अवलंबून आहे. अत्यल्प सिंचन असल्याने शेतीला जोड व्यवसाय देऊन शेतकरी आर्थिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत़ो; परंतु पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने दुग्ध व्यवसायही आव्हानात्मक झाला आहे. कंधार तालुक्यात पेठवडज, बाचोटी, बारूळ, बहाद्दरपुरा, वंजारवाडी, कंधारेवाडी, गौळ, आंबुलगा, पांगरा, बामणी, इमामवाडी, वाखरड, पानशेवडी, फुलवळ, घागरदरा, बिजेवाडी, रुई, सावरगाव, वरवंट, मंगनाळी, गोणार, येलूर, मसलगा, चिंचोली, सिरशी, चिखली, औराळ, नंदनवन, मंगलसांगवी, कौठा, तेलूर, काटकंळबा, धानोरा आदी गावांत दुग्ध व्यवसाय पशुपालक करीत असतात. मदर डेअरीची जी शीतकेंद्र आहेत. तेथे एकूण प्रतिदिन सुमारे दोन ते तीन हजार लिटर दूध संकलन केले जाते.

लोहा तालुक्यात कंधारपेक्षा जास्त शेतकरी व पशुपालक दुग्ध व्यवसायात असल्याचे दिसते. घावरी, रायवाडी, हाडोळी (ज) आदी गावांत शेतकरी आर्थिक आधारासाठी धडपड करताना दिसतात. टेळकी, ता.लोहा (पूर्वी कंधार ता.) हे क्रांतिकारक गाव आहे. निजाम राजवटीविरोधातील लढ्यात टेळकी, वडगाव, कापशी आदींसह परिसरातील गावे-तांडे यांनी सहभाग घेतला. काहीनी हौतात्म्य पत्करले. टेळकी गाव राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, लढाऊपणा आदींमुळे प्रसिद्ध आहे. या गावातील ८० टक्के शेतकरी दुग्ध व्यवसायात आला. शेतीपूरक व्यवसायाने आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा खटाटोप करीत आहेत. एकट्या टेळकी गावात दोन हजारांपेक्षा अधिक लिटर दूध संकलित होते, अशी माहिती अनिल हंबरडे, गजानन मोरे यांनी दिली.  

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत प्रसिद्ध असणारे लालकंधारी पशुधन शासनाच्या उदासीन धोरणाने दुर्लक्षित झाले आहे. गौळ, ता.कंधार येथे तीन दशकांपूर्वी लालकंधारी गोसंवर्धन केंद्राची स्थापना झाली. कै.शंकरराव चव्हाण यांनी उद्घाटन केले; परंतु त्याला मूर्त स्वरूप मात्र अद्याप आले नाही. माजी खा. व. आ. भाई केशवराव धोंडगे, माजी आ.गुरूनाथराव कुुरडे, ग्रामपंचायत गौळ, डॉ. श्याम पा. तेलंग आदींनी गोसंवर्धन केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी अनेकदा केली; परंतु याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे पशुपालकातून उघडपणे बोलले जात आहे. लालकंधारी नर शेती काम व व्यवसायातून आर्थिक आधारासाठी उपयुक्त आहेत. गाय दुधासाठी उपयुक्त आहे.

Web Title: Milk revolution in Telaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.