गुप्तधनासाठी थेट हेमाडपंथी मंदिराच्या गाभाऱ्यात खोदकाम, महादेवाची पिंडच बाजूला सरकवली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 06:36 PM2022-09-07T18:36:43+5:302022-09-07T18:37:02+5:30

यापूर्वी महादेव मंदिराच्या जवळच आतापर्यंत दोन वेळा खोदकाम झाले होते.

Mahadev's Pind was moved aside for secret money, excavation was done in Hemadpanthi temple in Kuntu | गुप्तधनासाठी थेट हेमाडपंथी मंदिराच्या गाभाऱ्यात खोदकाम, महादेवाची पिंडच बाजूला सरकवली

गुप्तधनासाठी थेट हेमाडपंथी मंदिराच्या गाभाऱ्यात खोदकाम, महादेवाची पिंडच बाजूला सरकवली

Next

कुंटूर (जि. नांदेड) : नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील महादेवाच्या हेमाडपंथी मंदिरात अज्ञातांनी गुप्त धनाच्या लालसेने पिंड बाजूला काढत खोदकाम केले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती समजतात कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेवपुरी हे घटनास्थळी पोहोचले. श्वान पथकासह फिंगरप्रिंट तज्ज्ञांची टीम हजर झाली. हे खोदकाम गुप्तधनांच्या लालसेपोटी केले असल्याची चर्चा गावात आहे.

कृष्णूर औद्योगिक वसाहतीत एका औषध कंपनीच्या जवळ हे ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. यापूर्वी या मंदिरामध्ये आजूबाजूला अनेक वेळा केवळ गुप्तधनासाठीच खोदकाम होत असल्याची चर्चा परिसरामध्ये रंगली आहे.

यापूर्वी महादेव मंदिराच्या जवळच आतापर्यंत दोन वेळा खोदकाम झाले होते. तेव्हा नागरिकांनी गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, आज सकाळी थेट मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच महादेवाची पिंड बाजूला सारून पिंड्याच्या खाली खोदकाम केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे ही खळबळ उडाली असून, संतापही व्यक्त होत आहे.

घटनास्थळी दाखल झालेल्या श्वानपथकाला मात्र तपासासाठी योग्य दिशा देता आली नाही. ज्यांनी हे खोदकाम केले ते वाहनातून आले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक वास्तू असल्याने काही तरी सापडेल याच उद्देशाने थेट मंदिराच्या गाभाऱ्यात खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम करणाऱ्यांनी कुदळ, फावडे व पाण्याचा कॅन जागेवर सोडून पळ काढला आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
सध्या गावोगावी चोरटे येत असल्याचे अफवांमुळे नागरिकांची झोप उडाली असतानाच अज्ञात आणि नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरालाच लक्ष केल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. अज्ञात आरोपींचा तपास लवकरच लावला जाईल, अशी ग्वाही कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक महादेवपुरी यांनी दिली आहे.

Web Title: Mahadev's Pind was moved aside for secret money, excavation was done in Hemadpanthi temple in Kuntu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.