Lok Sabha Election 2019 : शेकापचा लालबावटा मराठवाड्यातून पहिल्यांदाच रिंगणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 04:39 PM2019-04-02T16:39:49+5:302019-04-02T16:41:53+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मराठवाड्यातून लालबावटा हद्दपार झाल्याचे दिसून येते.

Lok Sabha Election 2019: Shetakari Kamgar Pakshya did not contest Lok sabha election for the first time from the Marathwada region | Lok Sabha Election 2019 : शेकापचा लालबावटा मराठवाड्यातून पहिल्यांदाच रिंगणाबाहेर

Lok Sabha Election 2019 : शेकापचा लालबावटा मराठवाड्यातून पहिल्यांदाच रिंगणाबाहेर

googlenewsNext

- विशाल सोनटक्के 

नांदेड : संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा मराठवाड्यासह महाराष्ट्रभर पसरला होता. नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीने विधानसभेसह लोकसभेतही आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्र गंभीर झालेले असताना संघर्षाचा इतिहास असलेला शेकापचा लालबावटा पहिल्यांदाच मराठवाड्यातून निवडणूक रिंगणाबाहेर गेला आहे. 

शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहिलेल्या उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, किशनराव देशमुख तसेच केशवराव धोंडगे आदींनी शेतकरी कामगार पक्षाचा मराठवाड्यात वेगळा दबदबा निर्माण केला होता. उद्धवराव पाटील यांच्या बांधणीमुळे  उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यात अनेक वर्षे शेकापचे अस्तित्व कायम होते. १९७७ च्या लाटेत उद्धवराव पाटील यांनी लातूर लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. या बरोबरच लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, रेणापूर व अहमदपूर तालुक्यांत शेकापचा प्रभाव होता. किशनराव देशमुख यांनी तब्बल तीन वेळा अहमदपूरचे प्रतिनिधीत्व केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातही परंडा, कळंब, उमरगा आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात शेकापने प्रभाव दाखविला होता. कळंबमधून कुंडलिक घोडके तर तुळजापुरातून माणिकराव खपले यांनी प्रत्येकी तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. तुळजापुरात नगराध्यक्षपदही शेकापकडे होते. बीड जिल्ह्यातील चौसाळ्याचे जनार्दन तुपे यांनी १९९५ पर्यंत काँग्रेसशी लढा दिला. तर माजलगावमध्ये गंगाभीषण धावरे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शेकापचा लालबावटा फडफडत ठेवला होता. परभणी जिल्ह्णात आण्णासाहेब गव्हाणे, नारायणराव वाघमारे, शेषराव देशमुख आदी मंडळींनी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचे काम केले. जिल्ह्यातील पाथरी, सिंगणापूर परिसरावरही शेकापची छाप होती. विशेष म्हणजे गंगाखेड मतदारसंघात शेकापच्याच ज्ञानोबा गायकवाड यांनी चार वेळा निवडून येण्याचा पराक्रम केला होता. हिंगोलीतील वसमतमध्येही शेकापने अनेक वर्षे झूंज दिली. १९७७ च्या लाटेत शेकापच्या भाई केशवराव धोंडगे यांनी नांदेडचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर कंधार विधानसभा मतदारसंघातू शेकापचेच गुरुनाथ कुरुडे निवडून आले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मराठवाड्यातून लालबावटा हद्दपार झाल्याचे दिसून येते.

जनता दल, जनता पार्टीही निष्प्रभ
जनता पार्टीचे नेते शरद जोशी यांनी १९९६ मध्ये नांदेड लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यांना ७१ हजार ४६० मते मिळाली होती; तर १९८९ ची लोकसभा जनता दलाच्या वतीने लढून २ लाख ७८ हजार ३२० मते घेत डॉ. व्यंकटेश काब्दे हे विजयी झाले होते. या बरोबरच १९९८ मध्ये जनता पार्टीच्या वतीने शंकर धोंडगे यांनी निवडणूक लढविली होती. त्याचवेळी जनता दलाकडून व्यंकटेश काब्देही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र शेकापप्रमाणेच याही दोन्ही पक्षांचा प्रभाव त्यानंतर ओसरत गेला. 

विधानसभेला सहा जागा लढविणार?
मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष लोकसभेची एकही जागा लढवीत नाही हे खरे आहे; परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शेकापसाठी मराठवाड्याला ६ जागा सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीशी शेकापचे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच शेकापसाठी असलेली मावळ लोकसभेची जागा पक्षाने पार्थ पवार यांच्यासाठी सोडली आहे. तिथे चार तालुक्यांत शेकापचे प्रभुत्व आहे. नवी पिढी शेकापसोबत जोडण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतल्या आहेत.
- भाई काकासाहेब शिंदे (औरंगाबाद), मराठवाडा विभागीय चिटणीस, शेकाप

Web Title: Lok Sabha Election 2019: Shetakari Kamgar Pakshya did not contest Lok sabha election for the first time from the Marathwada region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.