The audience also got wet with the "soaked things" | ‘भिजलेल्या गोष्टींनी’ प्रेक्षकही भिजले
‘भिजलेल्या गोष्टींनी’ प्रेक्षकही भिजले

ठळक मुद्देहौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा: श्रद्धांजलीलाही प्रेक्षकांतून हास्याचे फवारे

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक पाहतांना प्रेक्षकांतून हास्य व टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.
शहरातील कुसूम सभागृहात गुरूवारी मयूर निमकर लिखीत ‘भिजलेल्या गोष्टी’ हे नाटक सादर झाले. नवराम दर्शन को.आॅ. हौ.सो. डोंबिवली यांनी सादर केलेल्या या नाटकाने दोन व्यक्तीमधील सामाजिक दरी यावर भाष्य केले. एखाद्या आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून वाईट ठरवितो. वस्तुत: आपण स्वत:च्या अनुभवानंतर एखाद्या व्यक्तीबाबतचे मत ठरविले पाहिजे. परंतु, असे होत नसल्याने आपण माणूस ओळखू शकत नाही. हिच बाब ‘भिजलेल्या गोष्टींनी’ अधोरेखीत केली. या नाटकात लेखकाने तीन कथानकांचा आधार घेवून वरील मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. विशेष म्हणजे नाटकातील तीनही कथानकात दोन व्यक्तीतील दरी संपविण्यासाठी पाऊस धावून आल्याचे दिसते. बाहेर जोराचा पाऊस सुरू असताना कार्यालयात अडकलेली स्त्री आणि तिचा बॉस यांच्या संवाद होतो आणि त्या दोघांतील गैरसमज दूर होतात. दुसरे कथानकही अशाच पद्धतीचे पावसामुळे रेल्वेस्टेशनवर थांबलेल्या युवकास कधीकाळी त्याची प्रेमिका असलेल्या युवतीची भेट होते. दोघे एकमेकांवर प्रेम करीत होते. मात्र, तिचे लग्न दुसºयाशी झाले. त्यानंतर दोघांचीही मने एकमेकांविषयी दुषित झाली. मात्र पावसाच्या निमित्ताने का होईना, दोघांत संवाद घडतो. आणि ते एकमेकांना समजून घेतात. तिसरे कथानकही असेच पावसात घडते, या भिजलेल्या गोष्टी जीवंत करण्याचे काम तीन व्यक्तीरेखा साकारणाºया मयूर निमकरने ताकतीने केले. त्याला तेजल पोतदार, समीर जडे, स्वप्नील माळवदे, अंकूर निमकर, शेखर नंद, रेश्मा कदम यांचीही साथ लाभली.
जिवंत व्यक्ती नव्हे तर मोबाईलच झालाय मित्र
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात बुधवारी रात्री सादर झालेल्या ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोबाईलच्या आहारी गेलेला मानव जीवंत व्यक्तींना नव्हे, तर यंत्र असलेल्या मोबाईलला आपला खरा मित्र मानू लागला आहे. त्यामुळेच तो वास्तव जगापासूनही दूर जात असल्याचे या नाटकातून अत्यंत विनोदी पद्धतीने सादर करण्यात आले. विशेषत: वनिता खरात यांनी साकारलेले कोकरा काकू ही भूमिका लक्षवेधी ठरली. या काकू व्यासपिठावर आल्यानंतर हास्याची लकेर उमटत होती. दिपेश ठाकरे, वैष्णवी अंबवणे, आतिश मोरे, संकेत खेडेकर, स्वप्नील पाथरे, विकास मोटे, तुषार दळवी, किरण फडतरे, सिद्धेश माने, तेजस बोराडे, अमृता मोडक, सागर पवार, विपूल काळे, विक्रांत गबरे, सिद्धेश चव्हाण, सिद्धांत महाडीकर यांनीही यात भूमिका साकारल्या.


Web Title: The audience also got wet with the "soaked things"
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.