मराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटींची कामे; एकही काम अर्धवट राहणार नाही - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:54 PM2018-04-19T16:54:10+5:302018-04-19T16:57:54+5:30

मराठवाड्यातील कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, असे सांगताना २०० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली़

57 thousand 651 crore works in Marathwada; No work will be partial - Nitin Gadkari | मराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटींची कामे; एकही काम अर्धवट राहणार नाही - नितीन गडकरी

मराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटींची कामे; एकही काम अर्धवट राहणार नाही - नितीन गडकरी

googlenewsNext

- अनुराग पोवळे  

नांदेड : केंद्र शासनाकडून मराठवाड्यात ५७ हजार ६५१ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून त्यात नांदेड जिल्ह्यातील ८ हजार कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे़ मराठवाड्यातील ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, असे सांगताना २०० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली़

लोहा येथे गुरुवारी चाकूर-माळेगाव-लोहा-वारंगा, नांदेड-उस्माननगर-कंधार-फुलवळ-उदगीर आणि नांदेड-उस्माननगर-हळदा-कौठा-मुखेड-बिदर या तीन राष्ट्रीय महामार्गांचा भूमीपूजन सोहळा केंद्रीयमंत्री गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूरचे खा़सुनील गायकवाड, लोह्याचे आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़विनायक पाटील, आ़तुषार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या भूमीपूजन सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी विकासासाठी  वीज, पाणी, रस्ते आणि दळणवळणाची साधने  या चार बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले़ राष्ट्रीय महामार्गाची ही कामे मराठवाड्यात विकासाची नवी दिशा ठरणार आहे़ एका दिवसात ८ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन ही नांदेड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक बाब असल्याचेही ते म्हणाले, केंद्र आणि राज्य शासन केवळ विकासाच्या आधारावरच राज्य करत आहेत़ ज्यांना आता काम उरले नाही, विषय राहिले नाहीत, अशी राजकीय मंडळी आता जाती-पातीचे राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली़ 

मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्पांसाठी एक लाख कोटी
मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्पांसाठी एक लाख कोटी रुपये केंद्रीय जलसंधारण विभागाने मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली, आपण घोषणा केलेले एकही काम अपूर्ण राहणार नाही याचा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. 

५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमनगंगा पिंजर प्रकल्पातून मराठवाड्यासाठी २१ टीएमसी पाणी मागच्या सरकारने गमावले होते़ ते परत मिळवताना ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी आपणास केंद्रीय जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केल्याचे सांगितले़ यामुळे उत्तर महाराष्ट्रासह गोदावरी खोऱ्यातील धरणामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे़ राज्यातील जलयुक्त शिवार योजना, गाळयुक्त शिवार, स्वच्छता अभियान या योजनेत चांगले काम झाल्याचे ते म्हणाले़

बेघरमुक्त राज्य करण्याचा संकल्प
संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा कालच करण्यात आली आहे़ शौचालय बांधणीनंतर आता राज्यात प्रत्येकाला घर हे मिशन सरकारपुढे असल्याचे सांगितले़ पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे़ मात्र महाराष्ट्रात २०१९ मध्येच हे उद्दिष्टय पूर्ण करून देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले़ या योजनेसाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही असे सांगताना स्थानिक आमदारांनी आता बेघरांची नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले़ 

कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा़सुनील गायकवाड यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात लोहा-कंधार-गडगा-नरसी या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाचा देण्याची मागणी केली़ तसेच लोहा शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे कामही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केली होती़ या दोन्हीही मागण्या केंद्रीयमंत्री गडकरी यांनी मंजूर केल्या़ त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या भाषणात आ़ चिखलीकर यांनी मागण्यांचे निवेदन दिल्याचे सांगितले. आतापर्यंत चिखलीकरांच्या सर्वच मागण्या मान्य झाल्याचे सांगताना या निवेदनातील मागण्याही मान्य केल्याची घोषणा केली़

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आ़किशनराव राठोड, माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर, शहर महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, आ़सुधाकर भालेराव, गोविंदराव केंद्रे, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, लातूर जिल्हाधिकारी जी़श्रीकांत, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, ओमप्रकाश पोकर्णा, नागनाथ निरवदे, गणेशराव हाके आदींची उपस्थिती होती़  

Web Title: 57 thousand 651 crore works in Marathwada; No work will be partial - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.