तुमचे लॉकर सुरक्षित आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:52 AM2017-11-15T00:52:28+5:302017-11-15T00:57:06+5:30

राजधानी मुंबईत बँक आॅफ बडोदामध्ये सोमवारी दरोडा टाकून लॉकर फोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे बँकांमधील लॉकर्स सुरक्षित आहेत का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Is your locker safe? | तुमचे लॉकर सुरक्षित आहे का?

तुमचे लॉकर सुरक्षित आहे का?

Next
ठळक मुद्देराजधानीसारखे उपराजधानीतही वास्तवकाही ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था : एटीएम सीसीटीव्ही भरोसे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजधानी मुंबईत बँक आॅफ बडोदामध्ये सोमवारी दरोडा टाकून लॉकर फोडल्याची घटना घडली. या घटनेमुळे बँकांमधील लॉकर्स सुरक्षित आहेत का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लॉकर संदर्भात रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले निकष बँका खरंच पाळतात काय याचा आढावा लोकमत चमूने घेतला. यात राजधानीसारखी घटना उपराजधानीतही घडू शकते, अशी परिस्थिती काही बँकांमधील लॉकर आणि एटीएमची पाहणी केली असता दिसून आली. काही बँकांमध्ये उणिवा आढळून आल्या तर काहींमध्ये सुरक्षा नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून आले. इकडे लॉकरमध्ये चोरी झाल्यास त्याची जबाबदारी बँकांची असते की नाही, या किचकट पेचावर रिझर्व्ह बँकेने स्पष्ट काही केले नसले तरी चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता बँकांनी लॉकरच्या सुरक्षेसाठी काटेकोर प्रयत्न करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या आहेत. प्रत्येक बँकांनी लॉकर रूमचे बांधकाम करताना रिझर्व्ह बँकेच्या अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लॉकर रूम बांधताना इमारतीचे बांधकाम दमदार आणि आरसीसी पद्धतीचे असावे. स्लॅबसह लॉकरच्या चारही भिंतीमध्ये एरवीपेक्षा जास्त लोखंडी सळाखी असल्यास चोरट्याला तोडणे कठीण जाते. शिवाय बँकेचा अलार्म हा सुरक्षेचा मार्ग समजला जातो. बँकेतील तिजोरी वा लॉकरला चोरट्याने हात लावल्यास अलार्म मोठ्याने वाजला पाहिजे आणि त्यांची जोडणी व्यवस्थापक आणि विभागाच्या पोलीस ठाण्याला असावी. आमच्या बँकेच्या सर्व शाखांमध्ये याच पद्धतीची रचना असल्याचे मत स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंचे बिल ग्राहकाने जवळ ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लॉकरमधील वस्तूंच्या चोरीची जबाबदारी कुणाची?
लॉकरमधील वस्तूंची चोरी किंवा गहाळ झाल्यास भरपाई कोण देणार, हा प्रश्न पडतो. यावर बँकिंग तज्ज्ञांनी सांगितले की, सध्याच्या नियमांनुसार, लॉकरधारकांनी आपल्या लॉकरमध्ये काय ठेवले आहे, याची बँकांना कल्पना नसते आणि बँकेकडील किल्लीसोबत लॉकरधारकाची किल्ली वापरल्यावरच लॉकर उघडता येतो. लॉकर असलेल्या ठिकाणी बँका प्रचंड काळजी व सावधगिरी बाळगत असतात. त्यांच्याकडून काही चूक झालीच आणि ती सिद्ध झाली तरच त्यांना जबाबदार धरता येते. अन्यथा, बँकांनी भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे
बँक कडेकोट सुरक्षा तर ठेवतेच, पण लॉकरधारकाने आपल्या मौल्यवान वस्तू स्वत:च सांभाळायच्या असतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांनी लॉकर सुरक्षित केल्यास लॉकरधारकांना चोरीच्या घटनेला सामोरे जावे लागणार नाही, असा सूर बँकिंग तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना काढला. रिझर्व्ह बँकेचे नियम आणि अटीनुसार लॉकर सुरक्षित ठेवावेत, असे मत राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केले. यापूर्वीही नवी दिल्लीत चोरट्यांनी भुयार खोदून पंजाब नॅशनल बँकेतील लॉकर्समधून मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती.
लॉकरमधील वस्तूंना विम्याचे कवच द्यावे
ग्राहकाने आपल्या लॉकरमध्ये काय ठेवले आहे, याची बँकांना कल्पना नसली तरी काही बँका लॉकरमधील वस्तूंना विमाकवच देऊ करतात. प्रत्येक व्यक्तीला दिली जाणारी भरपाई संबंधित बँक आणि घेतलेले इन्शुरन्स कव्हर यावर अवलंबून असते. आग, चोरी वा नैसर्गिक आपत्ती या बाबतीत विम्याचे दावे कसे करायचे, या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे अजूनही पुढे आलेले नाहीत. शक्यतोवर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या लेखी नोंदी ठेवाव्यात. दुर्दैवाने चोरी झाली तर काय चोरीला गेले आहे, ते कळू शकेल.
जुन्या बंदूकीने बँकेची सुरक्षा
कामठी रोडवरील एका राष्टÑीयकृत बँकेत सुरक्षा गार्डजवळ जुन्या बनावटीची बंदूक आहे. गार्डची ड्युटी बँक सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत असते. अशा स्थितीत बँक आणि त्यातील लॉकरची सुरक्षा कशी होणार? हा सवाल आहे. लकडगंज येथील एका बँकेत गार्ड फाईलची ने-आण आणि फॉर्म भरून देण्याचे काम करतो. तसेच शंकरनगर, राणी दुर्गावती चौक, महाल, धरमपेठ येथील बँकांमधील गार्डजवळ सुरक्षेची साधने नव्हती. ते सुरक्षा एजन्सीचे गार्ड आहेत. ते केवळ ग्राहकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवू शकतात.
एटीएम मशीन असुरक्षित
बँकांच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, जवळपास ७५ टक्के एमटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी गार्ड नाहीत. वयस्क व्यक्ती सुरक्षा एजन्सीकडून ठेवतात. एटीएम मशीन केवळ सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून आहेत.
सेन्सर असतात, पण अ‍ॅक्टिव्ह नसतात
बँकिंग सुरक्षा विशेषज्ज्ञ तुषार घोरमाडे यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकांमध्ये अभेद्य इलेक्ट्रॉनिक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येतात. देशातील सर्व शासकीय व अशासकीय बँकांमध्ये त्याचे पालन होते. दरवाज्यावर मॅग्नेटिक सेन्सर असते. कुणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यास सेन्सर मुख्य मशीनला सूचना देते. दुसरे सेन्सर ‘पॅसिव्ह इन्फ्रारेड डिटेक्टर’ आहे. हे सेन्सर बँक बंद झाल्यानंतर बँकेत कुणी व्यक्ती वा प्राणी असल्यास मुख्य मशीनला सूचना देते. मुख्य मशीन एक कॉम्प्युटर असते. हा कॉम्प्युटर बँक प्रशासनाने कॉम्प्युटरसोबत जोडलेल्या नऊ लोकांना तात्काळ फोन करतो. ही मशीन खोलीच्या भिंतींची सुरक्षा करते. या मशीनमुळे वेगवेगळ्या बँकांमध्ये २०० पेक्षा जास्त चोºया पकडण्यात आल्या आहेत.
कोर्टाचे निर्णय काय म्हणतात
नियमांनुसार बँकांना जबाबदार धरता येत नसले तरी ग्राहक आपल्या वस्तूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या लॉकरमध्ये ठेवत असल्याने या वस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी बँकांचीच असल्याचे म्हणत कोर्टाने बँकेच्या विरोधात निकाल दिल्याची उदाहरणे आहेत. रिझर्व्ह बँकेनेही बँकांना जबाबदार ठरवण्याबाबत म्हटले आहे.
सुरक्षेबाबत बँका अलर्ट आहेत का?
लॉकरच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था असल्याचा दावा बँका कायमच करतात. पण सोमवारी झालेल्या दरोड्यामध्ये हे दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहेत. लॉकरच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, अलार्म बसवले नसल्याचे आढळून आले. बँकेने सुरक्षितता देण्याचे आश्वासन दिल्याने ग्राहकांनी लॉकर घेतले. केवळ मालक-भाडेकरू हे नाते दाखवून बँकेला हात वर करता येणार नाहीत. प्रत्येक वेळी बँका आपल्या जबाबदारीतून सहज मुक्त होऊ शकत नाहीत, असे मत बँकांच्या अधिकाºयांनी व्यक्त केले.
बँकेत चोख उपाययोजना
बँकेच्या नागपूर विभागातील ५२ शाखांमध्ये लॉकर्स आहेत. लॉकर रूम आरसीसी पद्धतीने बनविली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी अलार्म लावले आहेत. बँक बंद झाल्यानंतर कुणी बँकेत शिरल्यास अलार्म वाजतो. अलार्म परिसरातील पोलीस ठाण्याला जोडला आहे. मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेची काळजी घेतो.
- विजय कांबळे, उपमहाव्यवस्थापक,
बँक आॅफ महाराष्ट्र.

 

Web Title: Is your locker safe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.