नागपुरात  महिला पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:49 PM2019-04-26T23:49:38+5:302019-04-26T23:50:40+5:30

शादी डॉट कॉमच्या माध्यमातून संपर्क साधून लग्न करण्याची थाप मारत पोलीस दलात शिपाई असलेल्या तरुणीचे एका आरोपीने ७९ हजार रुपये हडपले.

Women police employee fraud in Nagpur | नागपुरात  महिला पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक 

नागपुरात  महिला पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक 

Next
ठळक मुद्देलग्न करण्याची बतावणी : ७९ हजार रुपये हडपले, सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शादी डॉट कॉमच्या माध्यमातून संपर्क साधून लग्न करण्याची थाप मारत पोलीस दलात शिपाई असलेल्या तरुणीचे एका आरोपीने ७९ हजार रुपये हडपले. कुंदन जगदीश साठवणे (वय ३२) असे आरोपीचे नाव असून तो रविनगर शासकीय वसाहतीत राहतो.
फसवणूक झालेली सोनाली चंद्रकांत मौदेकर (वय २८) ही तरुणी न्यू विराज सोसायटी, बेसा रोडला राहते. ती विशेष शाखेत कार्यरत आहे. १ डिसेंबर २०१८ ला तिची आरोपी कुंदन साठवणेसोबत शादी डॉट कॉमच्या माध्यमातून ओळख झाली. १ डिसेंबर २०१८ ला प्रत्यक्ष संपर्क केल्यानंतर कुंदनने सोनालीला आपण एमएसईबीत अभियंता असल्याचे सांगितले. तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून त्याने तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तो तिच्या घरी येऊ लागला. सोनालीच्या सर्व नातेवाईकांसोबत ओळख करून त्यांची माहिती घेतली. स्वत:बद्दल आणि स्वत:च्या नातेवाईकांबाबत मात्र तो मनात येईल, तशी माहिती देत होता. लग्न करण्याचे ठरल्यानंतर त्याने नवीच थापेबाजी सुरू केली. इथे प्रॉब्लेम झाला, तिथे काम अडले, असे सांगून त्याने सोनालीला आधी ५० हजार, नंतर, १०, ५ तसेच वेगवेगळी रक्कम मागून २४ एप्रिलपर्यंत तिच्याकडून ७९ हजार रुपये घेतले. दरम्यान, लग्न करायचे ठरल्यामुळे सोनालीने कुंदनला त्याचे घर दाखवण्यास सांगितले. मात्र, तो नेहमीच टाळत असल्याने तिला संशय आला. त्यामुळे २४ एप्रिलला सोनालीने काटोल मार्गावरील वीज मंडळाच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेथील अधिकाऱ्यांनी वीज मंडळात कुंदन साठवणे नामक अभियंता तर सोडा चपराशीही नाही, असे सांगितले.
जीवे मारण्याची धमकी
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सोनालीने त्याला फोन करून प्रशासकीय इमारतीजवळ बोलवले. तेथे पोहचल्यानंतर कुंदनला तिने तू फसवणूक का केली, अशी विचारणा केली. त्यामुळे कुंदन गोंधळला. आपली पोलखोल झाल्याचे त्याला लक्षात आले. त्यामुळे त्याने सोनालीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळून गेला. सोनालीने गुरुवारी रात्री सदर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक आर. एल. घुगे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी कुंदनचा शोध घेतला जात आहे. त्याने अशाच प्रकारे अनेकींना गंडा घातला असावा, असाही संशय आहे.

Web Title: Women police employee fraud in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.