नागपुरात महिलेने केला महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:34 AM2019-04-29T10:34:13+5:302019-04-29T10:37:59+5:30

अनैतिक संबंधातून महिलेची अथवा पुरुषाची हत्या होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. कळमन्यात मात्र पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेची चाकूने भोसकून हत्या केली.

Woman murdered woman in Nagpur | नागपुरात महिलेने केला महिलेचा खून

नागपुरात महिलेने केला महिलेचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देकळमन्यात अनैतिक संबंधाला संपविण्यासाठी चाकूहल्लाआईसोबत पतीही बनला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधातून महिलेची अथवा पुरुषाची हत्या होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. कळमन्यात मात्र पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेची चाकूने भोसकून हत्या केली. शनिवारी मध्यरात्री चिखली झोपडपट्टी चौकाजवळ ही थरारक घटना घडली. पिंकी ऊर्फ पूजा परेश वखरिया (वय ३५, रा. कळमना) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, तिची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी महिलेचे नाव जोत्सी ऊर्फ जोत्स्ना भोजराज सहारे (वय ३२) असून, या गुन्ह्यात तिला तिची आई प्रमिला जैन तभाने (रा. बाळाभाऊ पेठ, कमाल चौक) आणि नवरा भोजराज बोदुजी सहारे (वय ३४, रा. चिखली वस्ती कळमना) यांनीही मदत केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भोजराज आणि मृत पिंकी यांची सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली. कामावर जाताना, येताना ते भेटत बोलत. अनेकदा भोजराज पिंकीच्या घरीही जात होता. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी जोत्स्नाला आला होता. त्यामुळे जोत्स्ना तिच्या नवऱ्यासोबत नेहमीच वाद घालायची. तिने पिंकीला फोनवर आणि प्रत्यक्ष भेटूनही शिवीगाळ करून धमकावले होते. पिंकी आणि भोजराज दोघेही या संबंधाचा इन्कार करीत होते. पिंकीने जोत्स्नाच्या संशयी स्वभावाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती. मात्र, उगाच वाद वाढेल म्हणून भोजराजने तिला पोलिसांकडे जाण्यापासून अडवले होते.
या एकूणच प्रकारामुळे जोत्स्ना नेहमीच भोजराजसोबत भांडण करायची. हे माहीत पडल्याने जोत्स्नाची आई प्रमिला हिने काय आहे ते एकदा समोरासमोर भेटून वाद निकाली काढू असे सांगितले. त्यानुसार, जोत्स्ना, तिची आई प्रमिला आणि पती भोजराज या तिघांनी पिंकीला चिखली चौकात शनिवारी रात्री भेटायला बोलविले. त्यानुसार, पिंकी रात्री ११. ३० ला तेथे पोहचली. पिंकीला विचारपूस करतानाच जवळ लपवून ठेवलेला चाकू काढून जोत्स्नाने तिला भोसकणे सुरू केले. पोटात खोलवर घाव लागल्याने पिंकी जागीच ठार झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच कळमना पोलीस पोहचले. त्यांनी आरोपी जोत्स्ना, तिची आई प्रमिला आणि पती भोजराज यांना अटक केली.

ती तयारीनेच आली होती
पिंकीचा पती परेश एका कपड्याच्या दुकानात काम करतो. तर पिंकी बाहेरून कपडे आणून पिशव्या बनवून विकायची. घटनेच्या काही वेळेपूर्वी पिंकी पतीच्या दुकानात गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत एक मैत्रिण होती. पतीने तिला पाच हजार रुपये दिले. ते घेऊन मैत्रिणीसह ती घराकडे निघाली. मध्येच तिला भोजरानने घराजवळच्या चौकाजवळ भेटायचे आहे, पत्नी आणि सासू सोबत आहे, असे सांगितले. त्यामुळे मैत्रिणीजवळ पैसे देऊन पिंकी एकटीच तेथे गेली. जोत्स्ना तिचा घात करण्यासाठी तयारीनेच आली होती. त्यामुळे तिने पिंकीवर घाव घालून कायमच सर्वच संपवल. दुसरे म्हणजे, भोजराज आणि जोत्स्नाची आई सोबत असतानादेखिल त्या दोघांनी जोत्स्नाला आवरले नाही. त्यामुळे जोत्स्नासोबत हत्येच्या आरोपात हे दोघेही पोलिसांच्या कोठडीत पोहचले. संशयावरून एका महिलेने दुसऱ्या एका महिलेची हत्या करण्याची आणि आरोपी महिलेला तिच्या आईनेही मदत करण्याची ही नागपुरातील पहिलीच घटना आहे.

दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त
या घटनेमुळे दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. पिंकीला दोन छोटी मुले आहेत. पत्नीला पैसे दिल्यानंतर चांगले जेवण बनवून ठेवले असेल, म्हणून परेश घरी पोहचला. यावेळी घरात पिंकी नव्हती. दोन्ही मुले झोपून होती. त्यामुळे परेशने पिंकीला फोन लावला. यावेळी पिंकी, जोत्स्ना, तिच्या आईची आरडाओरड सुरू होती. भोजराजने त्याला मेयोत पोहचायला सांगितले. त्यानुसार, तो मेयोत पोहचला. तेथे पिंकी त्याला मृतावस्थेत दिसताच परेश खाली कोसळला. त्याचा संसार, छोटी मुलं आता आईच्या मायेला पोरकी झाली आहे. तिकडे जोत्स्ना आणि भोजराज पोलीस कोठडीत पोहचल्याने त्यांचाही संसार उद्ध्वस्त झाला आहे.

Web Title: Woman murdered woman in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून